Covaxin लस Omicron विरुद्ध लढण्यासाठी अधिक प्रभावी असू शकते – ICMR

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’नं जगभरातील लोकांची चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत हा व्हेरिएंट आढळून आल्यावर जगभरात एकच खळबळ माजली. अशा परिस्थितीत सध्या कोरोनावर जी लस वापरली जात आहे ती ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच भारत बायोटेकची कोविड लस कोव्हॅक्सिन ओमिक्रॉन व्हेरिएंटविरुद्ध अधिक प्रभावी ठरू शकते, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
हिंदू बिझनेस लाइननं आपल्या वृत्तात अधिकाऱ्याचं न देता म्हटलं आहे की, इतर उपलब्ध लसींच्या तुलनेत ओमिक्रॉनच्या विरूद्ध कोव्हॅक्सिन अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. कोवॅक्सिन, एक virion-निष्क्रिय लस संपूर्ण व्हायरस कव्हर करते आणि या अत्यंत उत्परिवर्तित नवीन व्हेरिएंटविरूद्ध कार्य करू शकते, असं अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

आणखी एका निनावी आयसीएमआर अधिकाऱ्यानं रिपोर्टमध्ये म्हटलं की, कोव्हॅक्सिन हे अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा सारख्या इतर प्रकारांविरूद्ध देखील प्रभावी असल्याचं आढळून आले आहे. त्यामुळे आम्ही आशा करू शकतो की ते नवीन व्हेरिएंटविरूद्ध देखील प्रभावी ठरेल. दरम्यान अधिक नमुने प्राप्त होईपर्यंत आणि चाचणी होईपर्यंत अधिकाऱ्याने आत्मसंतुष्टतेविरूद्ध इशारा दिला आहे.