इमारतीच्या डक्टमध्ये पडुन गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा मृत्यू
कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुणे : रावेत पोलिस ठाणे हद्दीतील एका बहुमजली ईमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून डक्ट मध्ये पडुन येथील मजुर कामगाराची मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी मुकाई चौक रावेत येथील एका ॲस्टोरीया राॅयल्स नावाच्या बांधकाम गृह प्रकल्पावर सायंकाळच्या सुमारास घडली होती. त्या चिमुकलीचा धायरीतील नवले रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बांधकाम साईटवर सुरक्षतेच्या दृष्टीने उपाययोजना केली गेली नसल्याने हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे.
बांधकाम साईटवर सुरक्षतेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना केल्या जात नसल्याने पुणे, पिंपरी चिंचवड शहरात अशा अपघाताच्या घटना घडल्याचे अनेक वेळा पुढे आले आहे. महापालिकांच्या बांधकाम विभागाकडून बांधकाम साईटवर बांधकाम व्यावसायिकाने सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत का याची पाहणी करणे आवश्यक आहे मात्र त्याकडेही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आले आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये निष्पाप लोकांचा बळी जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खुशबु निशाद (वय, वर्षे 5, रा. रावेत, मुळ छत्तीसगड) असे त्या गंभीर जखमी झालेल्या साईट वरील मजुराच्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रावेत येथील मुकाई चौक परीसरात मुख्य रस्त्यालगत ॲस्टोरीया राॅयल्स नावाचा एक मोठा बांधकाम प्रकल्प सुरू आहे. त्या ठिकाणी तीन मजली पार्कींगचे काम सुरू आहे. त्या बांधकामाच्या साईटवर काम करणारे मजुर त्याच ठिकाणी वास्तव्यास असुन त्यातील एका मजुराची पाच वर्षाची मुलगी खेळताना ईमारतीच्या डक्ट मध्ये पडुन गंभीर जखमी झाली होती.
त्या अत्यवस्थ मुलीवर वाल्हेकरवाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दि. 30 ऑगस्ट रोजी वाल्हेकरवाडी येथील खाजगी रुग्णालयातून त्या मुलीला पुण्यातील धायरी येथील नवले हाॅस्पीटल मध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते. शेवटी तीन दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या या चिमुरडीची दि. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राणज्योत मालवली. या बांधकाम साईटवर सुरक्षेच्या दृष्टीने जाळ्या व उपाययोजना नसल्याने हा अपघात घडला असुन संबधीत कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या केली जात आहे.
या संदर्भात रावेत पोलीस स्टेशनला संपर्क केला असता या घटनेची आकस्मित नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.