कर्वेनगरमध्ये दंडात्मक कारवाईमुळे भालेकर उद्यानाजवळ कचरा टाकणाऱ्यांची झाली पळापळ ; रात्रीच्या वेळी कारवाईसाठी सहाय्यक आयुक्त विजय नाईकल स्वतः रस्त्यावर
कर्वेनगर : रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेने पडत असलेल्या कचऱ्याला अटकाव आणण्यासाठी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नाईकल यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आरोग्य निरीक्षक व टीम बरोबर थांबून भालेकर उद्यान येथे कचरा टाकणाऱ्यांवर धडक दंडात्मक कारवाई केली. या दंडात्मक कारवाईमुळे कचरा टाकणाऱ्यांची चांगलीच पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी रात्री उशिरा १ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.
कर्वेनगर मधील भालेकर उद्यानाच्या कॉर्नरला रात्रीच्या वेळी परिसरात राहणारे विद्यार्थी, मेस चालक, भाजी विक्रेते यांच्याकडून कचरा टाकला जातो. याचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत लक्ष्मी नारायण पार्क सोसायटीच्या वतीने सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांना भेटून तशी तक्रार देण्यात आली होती.
सहाय्यक आयुक्त विजय नाईकल यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाची गांभीर्याने दखल घेतली असून भालेकर उद्यानाजवळ कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. गुरूवारी व शुक्रवारी रात्री उशिरा स्वतः नाईकल यांनी रस्त्यावर थांबून कचरा टाकणाऱ्यांना दंड ठोठावला. रस्त्यावर कचरा टाकायला येणाऱ्यांपैकी बरेच जण बाहेर गावाहून पुण्यात शिकायला आलेले विद्यार्थी किंवा नोकरी करणारे बॅचलर्स होते. कारवाई वेळी कचरा टाकणारे व अधिकारी यांच्यात वादही झाले, मात्र पोलीसी खाक्या दाखवल्या नंतर चूक कबूल करत कचरा टाकणाऱ्यांनी निमूटपणे दंड भरला. यावेळी लक्ष्मी नारायण पार्क सोसायटीच्या सचिव प्रतिक नलावडे तसेच सभासद ही उपस्थित होते.
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने हद्दीतील कर्वेनगर वारजे शिवणे उत्तमनगर परिसरात रस्त्याला पडणाऱ्या कचऱ्याच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी सहाय्यक आयुक्त विजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्वेनगरमध्ये काही कचरा पडण्याचे स्पॉट या कारवाई नंतर बंद झाले आहेत.