
पुणे : नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने प्रभाग १३ एरंडवणा हॅपी कॉलनी येथील विविध सोसायट्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या समवेत नागरिकांच्या प्रत्यक्ष संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी व माझे पोलिस दल कटिबद्ध असून सर्व घटकांच्या सहभागाने नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवू असे पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड म्हणाल्या.मी एकदा कारवाई सुरु केल्यावर मात्र कोणी नरम धोरण घेउ नका असेही त्यांनी नर्मविनोदी शैलीत सुनावले.
गिरीजाशंकर विहार,पोतनीस परिसर,सहवास सोसायटी,आसावरी, विभावरी,याद अपार्टमेंट, हॅपी कॉलनी ,पश्चिमानगरी व म्हात्रे पूल ते राजाराम पूल ( डी पी रस्ता ) येथील पदाधिकारी व नागरिकांनी आपल्या समस्या तीव्रतेने मांडल्या असता सर्व विषय समजून घेऊन,त्याची नोंद घेऊन त्यांनी जागेवरच वाहतूक पोलिस निरीक्षक सायकर व दामिनी पथकाच्या लांडे मॅडम यांना बोलावून घेतले आणि त्वरित कारवाईचे आदेश दिले.त्यांच्या ह्या कार्यतत्परतेने आम्ही भारावून गेलो असून अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न नक्की सुटतील असा विश्वास नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केला.तसेच कारवाईस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन ही दिले.
नगरसेवक दीपक पोटे यांनी गैरकृत्य करणाऱ्यांना जरब बसावी. अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच या विषयात मनपा आरोग्य खाते व अतिक्रमण खात्याचे संपूर्ण सहकार्य राहील असे स्पष्ट केले.
यावेळी नागरिकांनी मांडलेल्या प्रमुख समस्यांमधे
रात्री उशीरापर्यंत गोंधळ घालणारे तरुण तरुणी.
सिगारेट व मद्यपान करत दिवसादेखील आरडाओरडा करणारे आणि अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई.
वेगाने दुचाकी चालवत बुलेटचा कर्कश्श आवाज करत रात्री अपरात्री फिरणाऱ्या टोळ्यांवर कारवाई.
रस्त्यावर वाढदिवस साजरा करणारे व चारचाकी वाहनात बसून अश्लील चाळे करणारे महाभाग.
नो पार्किंग मधे किंवा पी १ पी २ चे पालन न करता अस्ताव्यस्त वाहने पार्क करुन शांतताप्रिय नागरिकांना हेतूपुरस्सर त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणे.
सोसायटीत बेकायदेशीर व्यवसाय करणारे व हटकल्यास वा शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यास दमदाटी करणाऱ्यांवर कारवाई करणे.
या सर्व विषयात त्वरित कारवाई केली जाईल व प्रसंगी दंडात्मक कारवाई चा परिणाम न झाल्यास गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिला.
यावेळी क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर व भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी सोसायट्यांनी त्यांच्या आवारातील व्यवसायिकां साठी आचारसंहिता तयार करावी.व त्याचे पालन न करणाऱ्यांची रीतसर तक्रार दाखल करावी असे सुचविले.
या वेळी कोथरूड मंडल उपाध्यक्ष राज तांबोळी,प्रभाग १३ अध्यक्ष राजेंद्र येडे,अनुराधा एडके,सुवर्णा काकडे,माणिक दीक्षित,रुपाली मगर,जागृती कणेकर,केतन क्षीरसागर यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गिरीजाशंकर विहार सोसायटी च्या वतीने संजय कबाडे , रवी गोखले, काशीनाथ पटवेकर,कैलास धंड,आनंद शेलार, यांनी,आसावरी, विभावरी,याद अपार्टमेंट,हनुमान ग्रेस सोसायटीचे हेमंत पाटणकर,सिद्धार्थ – श्रेया सोसायटीचे प्रमोद कृष्णकुमार,सहवास सोसायटीच्या वतीने जगदीश डिंगरे, पुरुषोत्तम भिडे,मनीष जोगळेकर, सचिन गुजर यांनी तर हॅपी कॉलनी,मालविका सोसायटीच्या वतीने सुनिता गारगोटे, शांभवी गारगोटे, वसुंधरा थोरात,विठ्ठल मंदिर परिसरातील निशीकांत भोमे इत्यादीं नी तक्रारी मांडल्या व निवेदन सादर केले.



