सकाळी तुमच्याही मोबाईलवर इमर्जेन्सी अलर्ट चा मेसेज आलाय का ? काय आहे नक्की प्रकार जाणून घ्या..

आज अनेकांचा मोबाईल सकाळी व्हायब्रेट झाला आणि त्यावर इमर्जेन्सी अलर्ट चा पॉपअप मेसेज आला आणि काही कळायच्या आत तो गेला. तुमच्याही मोबाईलवर असा मेसेज आला असेल, अनेक जणांनी हा मेसेज प्रकार नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी त्याकडे नेहमी प्रमाणे दुर्लक्ष केले.
सकाळी साडे दहाच्या सुमारास या इमर्जेन्सी अलर्ट मेसेजने अनेकांचा मोबाईल व्हायब्रेट झाला. काहींना हा मेसेज इंग्रजी मधून तर काहींना तो मराठीतून आला. अचानक आलेला हा अलर्ट मेसेज फ्रॉड असल्याचे बऱ्यापैकी लोकांना वाटले. त्यामुळे कोणाला असा मेसेज आलाय का याची चौकशी एकमेकांना विचारून केली जात होती.
काय होता हा मेसेज नक्की हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता भारत सरकारच्या दूरसंचार विभागानं हा संदेश पाठवल्याचे नमूद होते. हा आपत्कालीन संदेश होता मात्र हे नोटिफिकेशन पाठवत असताना भारत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याने या मेसेज मुळे नागरिकांच्या मनात संभ्रम व भीती निर्माण झाली.

या इमर्जेन्सी अलर्ट पॉपअप मेसेजने भीती वाटून घेण्याचे काही कारण नाही. सध्या भारत सरकार इमर्जन्सी अलर्ट सेवेची चाचणी घेत असून त्या अंतर्गतच असे मेसेज पाठवण्यात आले होते. सरकारच्या दूरसंचार विभागाकडून ही चाचणी घेण्यात आली होती. भविष्यात काही इमर्जेन्सी सूचना द्यायच्या असतील तर केंद्र सरकारकडून असा आपत्कालीन मेसेज येऊ शकतो या मेसेजच्या माध्यमातून सरकार विशिष्ट माहिती तुमच्या पर्यंत पोहचवू शकते.












