पुणे महापालिका करत असलेल्या रंगयात्रा ॲप विरोधात घंटानाद आंदोलन..

रंगकर्मी, व्यवस्थापक, नाट्य निर्माते यांनी केली जोरदार घोषणाबाजी
नाट्यगृहात नाट्यसंस्थांनाच प्राधान्य मिळावे.. नाट्यगृह व्यावसायिक सभागृह होऊ नये..
पुणे : पुण्यातील सांस्कृतिक भवनांचे (नाट्यगृहे) तारखांचे ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने रंगयात्रा ॲप तयार करण्यात येत असून यामुळे अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे आज बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहाबाहेर रंगकर्मी व्यवस्थापक, नाट्य निर्माते यांनी एकत्र येत घंटानाद आंदोलन केले. बंद करा बंद करा ऑनलाईन ॲप बंद करा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी नाट्यकर्मींच्या वतीने मागणीचे निवेदन पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले..या निवेदनात महत्वाचे मुद्दे उपस्थित करत या तयार करण्यात येत असलेल्या रंगयात्रा ॲपमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या आहेत. यावेळी शिरीष कुलकर्णी, सुनील महाजन, सत्यजीत धांडेकर, मोहन कुलकर्णी, शिरीष रायरीकर, प्रवीण बर्वे, समीर हंपी, वरुण कांबळे, शशिकांत कोठवळे, नाना मोहिते, बाबा पाटील, अशोक जाधव, प्रमोद रणवरे, जतीन पांडे दीपक पवार आदी यावेळी उपस्थितीत होते.

देण्यात आलेल्या निवेदनात खाली मुद्दे मांडण्यात आले आहेत.
बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्यातील प्रथम सांस्कृतिक केंद्र (नाट्यगृह) आहे व ते रंगमंदीरच रहावे. सर्व रंगकर्मी हे कलेचे मंदिर मानून त्याच भावनेतून आपली कला ते निष्ठेने रसिकांच्या चरणी अर्पण करतात. नाट्यगृह हे म.न.पा. चे व्यावसायिक सभागृह होऊ नये, नाहीतर या नाट्यगृहांचे ऑनलाईन बुकिंग जर परस्पर कोणीही केले तर कोणत्या स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी बुकिंग केले हेच कळणार नाही. सदर कार्यक्रम सादरीकरणाचे ऐनवेळीच समजेल की, त्यादिवशी नाटक आहे की गाण्याचा कार्यक्रम, मैफल आहे, नृत्याचा कार्यक्रम आहे की बक्षीस वितरण समारंभ, पुस्तक प्रकाशन समारंभ, शाळा कॉलेजचे स्नेहसंमेलन आहे की अन्य काही कार्यक्रम आहे. त्या ऐवजी संबंधित संस्थेचे लेखी अर्ज व्यवस्थापनाकडे आले तर कोणत्या कार्यक्रमाचे वापरासाठी नाट्यगृह हवे आहे ते समजू शकेल. त्यामुळे संबंधित संस्थेला आरक्षण द्यावयाचे की नाही व त्याचे भाडे किती आकारावयाचे ते व्यवस्थापनाला समजेल. नाहीतर सरसकट भाडे आकारले जाईल व काही संस्थांना सवलतीत बुकिंग मिळेल तर काहींना जादा आकारणी होईल. पर्यायाने म.न.पा.चे च नुकसान होईल.



सध्या चौमाही तारखा वाटपाची पध्दत आहे. निरनिराळ्या नाट्य व इतर संस्थांना त्यांनी मागील चौमाहीत सादर केलेल्या कार्यक्रमांचे प्रमाणात पुढील चौमाही वाटपामध्ये तारखा मिळतात. बऱ्याच नाट्यसंस्था मुंबईच्या असून नाटकांमध्ये प्रशांत दामले, संकर्षण कऱ्हाडे, भरत जाधव, सयाजी शिंदे, प्रिया बापट, उमेश कामत,
अशोक हांडे, निर्मिती सावंत, शरद पोंक्षे, उपेंद्र लिमये, मोहन जोशी आदी व्यस्त कलाकारांचा समावेश असतो. या कलावंतांच्या तारखा खूप दिवस आधी नाट्य निर्मात्यांना मिळत नाहीत त्या ऐनवेळी मिळतात. त्यामुळे ऐनवेळी धावाधाव करून नाट्यप्रयोग आयोजित करावे लागतात. ऑनलाईन बुकिंगमुळे नाट्यगृह उपलब्धतेच्या
अडचणींमुळे अशा नाटकांसाठी नाट्यप्रयोग आयोजित करणे शक्यच होणार नाही, खूपच अडचणीचे होईल.
राजकीय संस्था किंवा राजकीय वर्चस्व असणाऱ्या सामाजिक संस्था यांच्या कार्यक्रमांना ऑनलाईन सोयीमुळे सोयीस्कर होईल, त्यामुळे नाट्यसंस्थांना तारखा कमी मिळतील व नाट्यगृहात नाट्यप्रयोग होण्याऐवजी इतरच कार्यक्रम होण्याचे प्रमाण वाढेल. नाट्यसंस्थेशिवाय बाहेरील खाजगी व्यावसायीक संस्था आर्थिक सक्षमतेच्या जोरावर ऑनलाईन बुकिंग करून नाट्य व्यवसायच अडचणीत आणतील. (उदा.एखाद्या सामाजिक संस्थेने हैद्राबादहून ऑनलाईन बुकिंग केले व ऐनवेळी वधु- वर मेळाव्यासारखा कार्यक्रम केला तर येथे व्यवस्थापनाला कळणार नाही.) बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णाभाऊ साठे (पद्मावती) गणेशकला क्रिडा मंच, कै. विठ्ठलराव तुपे नाट्यगृह ही नाट्यगृहे असल्याने नाट्यसंस्थांनाच प्राधान्य मिळावयास हवे अशी भूमिका निवेदनात मांडली आहे.
विमान/रेल्वे/हॉटेल याच्या ऑनलाईन सुविधा बुकिंग सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी योग्य आहेत पण नाट्यगृहांसाठी योग्य वाटत नाहीत कारण सर्वसामान्यांना नाट्यगृहाचे बुकिंग लागत नाहीत, कार्यक्रम करणाऱ्या संस्थांनाच व संयोजकांना फक्त त्याची आवश्यकता आहे. सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे व नाटकांचे
तिकीटांचे ऑनलाईन बुकिंग व्यवस्थित चालू आहे व त्याचा लाभ रसिक प्रेक्षक घेत आहेत. (उदा. बुक माय शो, तिकिटालय, तिकीट खिडकी इ . ) या ऑनलाईन बुकिंगबाबत पूर्वी चर्चा झाली होती, त्याबाबत प्रशासनाकडून प्रयत्नही झाला होता, पण आम्ही सर्व नाट्य व्यावसायिक, कलावंत, संयोजकांनी त्याबाबतच्या अडचणी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या होत्या. त्यावेळी याबाबत ऑनलाईन बुकिंग नसावे या म्हणण्याला त्यांनीही संमती दर्शविली होती.
रंगकर्मी, व्यवस्थापक, नाट्य निर्माते सर्व अडचणींचा विचार करून नाटकांचे प्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रम जास्तीत कसे सादर होतील याबाबत सर्वानुमते विचार व्हावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



