असा साजरा होतो सिंगापूर मधील महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव ; मंदार रेडे यांचा अनुभव

सिंगापूर : आज आमच्यासाठी भाग्याचा दिवस म्हणता येईल कारण सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळात होत असलेल्या गणेशोत्सव कार्यक्रमांचे आमंत्रण मिळाले. सिंगापूर मधील गणेशोत्सव कसा असतो याबाबत फार पूर्वी पासून मनात उत्सुकता होती आणि प्रत्यक्षात तो अनुभव आता घेता येणार होता.
परंतु परदेशात जिथे हिंदू सण साजरे करायला अनेक राजकीय, सामाजिक बंधने असतात तिथं कसे सण साजरे होत असतील याचे कायम कुतूहल वाटत होते. आखाती देशात गणपती बसवणे हे एक मोठे आव्हान असते, ना मिरवणूक, ना ढोल ताशा, ना लोकांची सार्वजनिक ठिकाणी होणारी रेलचेल अशा परिस्थितीत त्या विघ्नहर्त्याला एका छोट्याश्या सभागृहात दीड दिवसाकरिता विराजमान व्हावे लागते हे मी प्रत्यक्षात अनुभवले असल्यामुळे सिंगापूर मध्ये गणेशोत्सव कसा साजरा होत असावा याची उत्सुकता वाढली होती.
योगायोगाने महाराष्ट्र मंडळ सिंगापूर चे आमंत्रण मिळाले, गणेशाची प्राणप्रतिष्ठा दिवस असल्याने माझ्या जागेपासून सुमारे तासाभराच्या अंतरावरील कार्यक्रमास्थळी मी व माझा मित्र पंकज पोहचलो. सभागृहाच्या बाहेर ओळीत मांडलेल्या त्या चपला, बूट एखाद्या तिसरीच्या वर्गाच्या शिस्तबद्ध रांगेत उभ्या राहिलेल्या विद्यार्थ्यांसारख्या दिसत होत्या. आतील वातावरण खूप धार्मिक व प्रसन्न वाटले, पारंपरिक वेशभूषा परिधान करुन अनेक अनिवासीय भारतीय कुटुंबे आरतीची वाट बघत होते. एका बाजूला तेथील पारंपरिक वेशातील स्थानिक मंडळींचे ढोल पथक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.







अध्यक्षांनी माईक हातात घेत, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व आजच्या आरतीचे प्रमुख पाहुणे म्हणुन आलेल्या भारताचे सिंगापूर मधील उच्चायुक्त (HIGH COMMISSIONAR) डॉ. शिल्पक अंबुले यांची ओळख करुन दिली व त्यांच्या हस्ते गणपतीची, शंकराची, पांडुरंगाची तसेच ज्ञानराजाची आरती धार्मिक वातावरण, ढोल ताशांच्या गजरात झाली. या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर अनिवासीय भारतीय उपस्थित होते. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे अनेक कुटुंबे आपल्या मुलांना घेऊन आली होती व आपल्या पाल्यांना गणेशोत्सवाचे महत्व सांगताना दिसली. आपले सण, परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहचवणे खूप आवश्यक आहे, जे प्रत्येकाने करणे गरजेचे आहे तरच आपला हिंदू धर्म टिकेल.
सिंगापूर मधील भारतीय उच्चायुक्तांशी , येथील अनिवासीय भारतीयांनी जपलेली हिंदू संस्कृती याबद्दल चर्चा झाली. सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळात सुमारे 1200 पेक्षा जास्त सभासद आहेत, जे दर महिन्याला आपले पारंपरिक हिंदू सण जसे की होळी, गुढी पाडवा, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी सण एकत्रपणे उत्साहाने साजरे करतात. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात 5000 पेक्षा जास्त भारतीय दर्शनाला येतात. अथर्वशीर्ष पठण, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनपर उपक्रम असा भरगच्च कार्यक्रम असतो, ढोल ताशाचा गजर आपले पाय आपसूक थिरकायला लावतो.
दगडूशेठ गणपतीची असलेल्या मूर्तिचे विसर्जन वाजत गाजत त्या भागातील पाण्याच्या मोठ्या हौदासारख्या टाकीत केले जाते. खास पुण्यावरून कार्यक्रमाला आल्यामुळे आमचे या निमित्ताने विशेष कौतुक झाले व योग्य सन्मान झाला.परदेशात आपला गणेशोत्सव साजरा करताना मन मात्र पुण्याच्या मानाच्या गणपतीतच अडकले होते. आजच्या या पवित्र दिनी एक वेगळा अनुभव म्हणता येईल, अनेक ओळखी झाल्या ज्या भविष्यात सामाजिक दृष्ट्या उपयोगी पडतील..
परदेशात आपला गणेशोत्सव साजरा करताना मन मात्र पुण्याच्या मानाच्या गणपतीतच अडकले होते. आजच्या या पवित्र दिनी एक वेगळा अनुभव म्हणता येईल, अनेक ओळखी झाल्या ज्या भविष्यात सामाजिक दृष्ट्या उपयोगी पडतील..
मंदार रेडे,पुणे
(सध्या सिंगापूर येथे वास्तव्य)












