बारामती लोकसभा मतदार संघातील वारजे भागात उद्या होणाऱ्या कार्यक्रमामुळे राजकीय वातावरण तापले.. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आमने सामने येणार ?

मल्टीस्पेशालिटी हिलींग हॉस्पिटलचे भूमिपूजन व पाण्याच्या टाकीचे होणार उद्घाटन
वारजे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून बारामती लोकसभा मतदार संघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे या मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे विरुध्द अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघातील तापलेल्या वातावरणात उद्या मतदार संघातील वारजे भागात होत असलेल्या विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमामुळे राजकीय धुरळा उडणारा आहे.
उद्या दिनांक १० मार्च रोजी वारजे परिसरात पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हिलींग हॉस्पिटलचे भूमिपूजन व पाण्याच्या टाकीचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत. तसेच महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार ही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे ही उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामळे सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे आमने सामने याण्याची चिन्हे असून राजकीय खडाजंगी होण्याची संभावना आहे.

वारजेत महायुतीकडून या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जोरदार फ्लेक्स बाजी करण्यात आली असताना सुळे समर्थक माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी सुप्रिया सुळे यांचे फ्लेक्स लावले असल्याने फ्लेक्स वॉर रंगले आहे. त्यामुळे वारजेतील वातावरण आताच तापले आहे. उद्या कार्यक्रमस्थळी नेत्यांच्या भाषणातून होणाऱ्या फटकेबाजी बाबत उत्सुकता लागलेली दिसून येत आहे. एवढे वर्ष लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा प्रचार करणारे पदाधिकारी आता विरोधात असणार असून सुळे कार्यक्रमाला आल्याच तर एकमेकांसमोर आल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटणार आहेत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
उद्याचा वारजेतील कार्यक्रम म्हणजे एकप्रकारे बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या प्रचाराचा नारळच फुटणार आहे. त्यामुळे या होणाऱ्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. मुळात वारजे माळवाडी भागातील चारही नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. मात्र पक्षात फूट पडल्यानंतर या ठिकाणीही फूट दिसून आली. तर काहींची भूमिका उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून येईल.
उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महायुतीकडून लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरती स्थान देण्यात न आल्याने आरपीआय आठवले गटात नाराजी असल्याची चर्चा सध्या वारजेत सुरू आहे. या लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरती महायुतीचे सर्व नेते मंडळी व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो दिसून येत आहेत मात्र यात आरपीआयचे स्थानिक पदाधिकारी दिसत नसल्याने ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे.



राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) चे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष बाबा धुमाळ म्हणाले की, वारजे आणि परिसरासाठी सुसज्ज हॉस्पिटल होत आहे याचा आनंद आहे. हे हॉस्पिटल व्हावे यासाठी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या हॉस्पीटलच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य विषयक सुविधा मिळणार असून त्याचा रुग्णांना चांगला लाभ होणार आहे.
याबाबत माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी म्हंटले आहे की, या भागाचा नगरसेवक झाल्यापासून आपल्या परिसरात सर्व सुविधांनी युक्त असे हॉस्पिटल असावे असे माझे स्वप्न होते आणि त्यासाठी मी गेली सहा सात वर्ष पाठपुरावा करत होतो. या पाठपुराव्याला यश आले आणि आज अतुलनगर मध्ये महापालीकेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ हॉस्पिटल होत आहे याचा आनंद आहे.






