अजबच… महापालिका निवडणूक लढविण्यासाठी चक्क बायको पाहिजे

महापालिका निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, अशा आशयाचे हे बॅनर असून औरंगाबाद शहरात तीन ठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच जातीची कुठलीही अट नाही, असंही या बॅनरवर लिहिलं आहे. रमेश विनायकराव पाटील यांनी हे बॅनर लावले आहे.
मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे. त्यासाठी कुठलीही जातीची अटक नाही. कुठल्याही जातीची महिला चालेल. वय वर्ष 25 ते 40 वयोगटातील अविवाहीत, विधवा किंवा घटस्फोटीत महिला चालेल. पण, त्यात एक अट ठेवण्यात आली आहे. या महिलांना दोनच अपत्य असावी. जास्त असेल तर त्या महिलांना स्वीकारण्यात येणार नाही, असं या बॅनरवर लिहिलं आहे.
मी सामाजिक कार्यकर्ता आहे. मी समाजासाठी खूप कामे केली आहेत. पण, लॉकडाऊनमध्ये मला तिसरं अपत्य झालं. त्यामुळे मी निवडणूक लढवण्यासाठी पात्र नाही. माझ्या घरातून एका व्यक्तीनं निवडणूक लढवावी आणि समाजाचे प्रश्न मांडावे असे मला वाटते. त्यामुळे बायको मिळाली तर मी तिला निवडणुकीसाठी उभे करणार. हे बॅनर लागल्यानंतर मला चार-पाच फोन आले. पण, मी त्यांना काहीही प्रतिक्रिया दिली नाही. दोन-तीन दिवसात आणखी फोन येतील. सर्वांचा विचार करून जी लोकांची सेवा करेल अशा महिलेची निवड केली जाईल. घरातून देखील याला विरोध नाही. आई-वडिलांशी देखील बोलणं झालं आहे. ज्या महिला इच्छूक असतील त्यांनी यावं. त्यांचं स्वागत आहे, असं पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
