कर्वेनगरमधील वडार वस्ती श्रमिक वसाहतमध्ये नेमकं चाललंय तरी काय ? झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावरून वातावरण तापले..
कर्वेनगर : कर्वेनगरमधील वडार वस्ती व श्रमिक वसाहत परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावरून वातावरण तापले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पा संदर्भात कर्वेनगर मुख्य चौक व श्रमिक वसाहत याठीकणी लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा कर्वेनगर परिसरात आहे. या बॅनर प्रकरणावरून नेमकं या वस्त्यांमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न आता सर्वांना पडू लागला आहे.
कर्वेनगर मधील वडार वस्ती व श्रमिक वसाहत या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची चर्चा मागील अनेक वर्ष सुरू आहे. सध्या झोपडपट्टी वासियांचे ॲग्रिमेंट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. वस्तीत सँपल फ्लॅट तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. मध्यंतरी विकसकाची काही माणसे झोपडपट्टीत आली असताना स्थानिक व त्यांच्यात चांगलेच वाद झाल्याचे पुढे आले होते. त्यामुळे या वस्त्यांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे वातावरण चांगलेच धुमसत आहे.
सध्या कर्वेनगर मुख्य चौकात वडार वस्तीच्या प्रवेशद्वाराजवळ व श्रमिक वसाहत याठिकाणी मोठे सावधानतेचा इशारा देतानाच जाहीर आवाहन करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. अनेक आरोप या बॅनरवर करण्यात आले असल्याने झोपडपट्ट्यांमधील वातावरण ढवळून निघाले आहे.
काय आहे बॅनर वरील मजकूर
सावधान !! सावधान !! सावधान !!
जाहिर आवाहन
स.नं. ५३ वडारवस्ती श्रमिक वसाहत कर्वेनगर मधील रहिवाशांनसाठी नम्र विनंतीचे आवाहन…आपल्या वस्तीतील काही रिकाम टेकडे लोक व राजकारणी स्वतः च्या फायद्यासाठी बिल्डरला वस्ती विकण्याचा डाव आखत आहेत. तरी कृपया करून सर्व नागरीकांनी कोणालाही आपल्या घराचे व स्वतःचे कागदपत्रे देऊ नये. व कुठल्याही कागदपत्रावर सह्या करु नये. व पूर्वी ज्यांनी नकळत ॲग्रीमेंट केले होते ते रद्द झालेले आहे. तरी नव्याने ॲग्रीमेंट करू नये. हि नम्र विनंती. कोणीही आपल्या वरती बळजबरी किंवा धमकी देत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करावा किंवा आपल्या वस्तीतील सामाजिक कार्यकर्त्यांना कळवावे. सौजन्य : अखिल वडारवस्ती व श्रमिक वसाहत
या आशयाच्या लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.