कोथरूडमधील भाजप प्रदेश पदाधिकारी सचिन फोलाने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) मध्ये प्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या प्रवेशाने चर्चा
पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आता राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. कोथरूड विधानसभा मतदार संघाचे वातावरण तापू लागले असताना कोथरूड परिसरातील भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन फोलाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.
लोकसभा निवडणुकांच्या वेळी भाजप नेते, उच्च तंत्र शिक्षण मंत्री, कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत जाऊन शरद पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न करत एक विधान केले होते. त्याचाच बदला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी कोथरूड मतदार संघात काढणार असल्याचे दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे पदाधिकारी फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सचिन फोलाने हे कोथरूडमधील भाजप पक्षाच्या विविध महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. त्यांनी पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये योगदान दिले आहे. सचिन फोलाने यांनी भाजपात अनेक वर्षे महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकहितकारक धोरणांशी प्रेरित होत आणि शरद पवार साहेबांच्या विचारधारेशी एकरूप होत, त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
प्रवेश सोहळ्यावेळी जयंत पाटील यांनी फोलाने यांचे स्वागत करताना सांगितले की, सचिन फोलाने यांच्या पक्षप्रवेशामुळे कोथरूडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक बळकट होईल. त्यांच्या अनुभवाचा आणि कर्तृत्वाचा फायदा पक्षाला मिळणार आहे. आजच्या राजकीय परिस्थितीत युवकांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे असून, फोलाने यांच्या नेतृत्वामुळे पक्षाला फायदा होईल.
सचिन फोलाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेशी प्रेरित होऊन आणि पक्षाचे आदर्श नेते श्री. शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. या प्रसंगी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, उपाध्यक्ष संदीप बालवडकर अन्य वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.