पालिकेच्या समाज विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवा : सुतार

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा म्हणून जाहीर प्रकटन देऊन अर्ज मागवण्यात आले आहेत. मात्र या संदर्भातील माहिती अद्याप नागरिकांपर्यंत पोहचली नसून ज्यांना माहिती आहे त्यांनाही अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे समाज विकास विभागाच्या विविध योजनांसंदर्भात अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे. Extend the application deadline for the citizens to avail the benefits of various schemes of Social Development Department
या संदर्भातील निवेदन सुतार यांच्याकडून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे देण्यात आले आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना, युवक कल्याणकारी योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना या योजनाअंतर्गत युवक , युवती,महिला व पुरुष नागरिकांकडून प्रस्ताव (अर्ज ) मागविण्याबाबत जाहीर प्रकटन देण्यात आले होते.

हे अर्ज भरण्यासाठी दि.११ डिसेंबर २०२० ते २९ जानेवारी २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परंतु सदरच्या योजनेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचलेली नाही, तसेच अनेक नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत अडचणी निर्माण होत असल्याचे सुतार यांनी म्हंटले आहे.
या योजनांसाठी अर्ज भरण्याची मुदतवाढ देण्यात आली नाही तर नागरिकांना लाभ मिळू शकणार नाही, तरी सदरचे योजनेसाठी एक महिन्याची मुदतवाढ अर्ज स्विकारण्यासाठी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षाच्या वतीने पृथ्वीराज सुतार यांच्याकडून आयुक्तांकडे करण्यात आली आहे.






