दिवे घाटात भीषण अपघात, अनेक वाहनांना धडक देऊन टँकर दरीत कोसळला; दोघांचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी

पुणे : पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. दिवे घाटात टँकर दरीत कोसळून हा अपघात झाला असून टँकरने काही दुचाकींना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकरने समोरून येणाऱ्या वाहनांना उडवत टँकर शेजारी असलेल्या दरीत कोसळला आहे.या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यु टीम, अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत घटनास्थळी धडक दिलेली वाहने पडलेली असून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टँकरने काही गाड्यांना धडक देऊन थेट दरीत कोसळला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून अपघातग्रस्त टँकर हा अॅसिडने भरलेला असल्यामुळे अॅसिडची गळती सुरु झाली आहे. या अपघातग्रस्त टँकर खाली किती जण अडकले आहेत. याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. टँकर उचलल्या नंतर माहिती समजू शकणार आहे. अपघातग्रस्त टँकर सासवड वरुन हडपसरच्या दिशेने येत होता. शेवटच्या वळणावर उताराला असताना टँकरने वाहनांना धडक देत दरीत कोसळला




