कोथरूडमध्ये होर्डींगसाठी वृक्षतोड ; अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..वृक्ष अधिकारी केदार वझे कधी कारवाई करणार ?

कोथरूड : Pune Kothrud कोथरूड मध्ये झाडे कापून होर्डींग लावले जात असताना महापालिका वृक्ष अधिकारी आणि आकाश चिन्ह निरीक्षक मात्र टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. अशी झाडे तोडून जाहिरात होर्डींग अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच लावली जात आहेत का असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सध्या कोथरूडमध्ये कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे नक्की काय सुरू आहे अशी म्हणण्याची वेळ आली आहे. मनमानी कारभाराची प्रचिती आणि बेकायदा कामांकडे दुर्लक्ष अशी एकूण परिस्थिती कोथरूडमध्ये पाहिला मिळत आहे.
कोथरूड मधील कोथरूड स्टँड पासून कर्वे पुतळ्याकडे येताना दादुस स्वीट जवळ एक जाहिरात होर्डींग उभा करण्यात आले आहे, मात्र हे हॉर्डींग उभा करत असताना त्याला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. होर्डिंग लावण्यापूर्वी नियोजनपूर्वक झाडाची कत्तल करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. झाडाची कत्तल केल्यानंतर लगेच होर्डींग लागल्याने या ठिकाणी हेतू स्पष्ट दिसत असतानाही अधिकाऱ्यांची डोळेझाक कशासाठी सुरू आहे याबाबत नागरीकांमध्ये तर्क वितर्क लढवले जात आहेत.

या संदर्भात सुरवातीला वृक्ष अधिकारी केदार वझे यांना संपर्क साधला असता त्यांनी आकाशचिन्ह निरीक्षक राजू ढाकणे यांना संपर्क साधण्यास सांगितले. ढाकणे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही याबाबत उद्यान विभागाला अभिप्राय मागितला आहे. या झाडांच्या फांद्या होर्डींगचालकांनी कापल्या नसून दुसऱ्याच कोणी कापल्या आहेत असे होर्डींगवाले सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. ढाकणे यांची ही उत्तरे म्हणजे होर्डींग चालकाला पाठीशी घालण्यासारखे आहेत. त्यामुळे या विषयात नागरिकांकडून शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. पुन्हा वझे यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून माहिती घेऊन सांगतो असे सांगण्यात आले. त्यामुळे या विषयात लावला जात असलेला विलंब शंका उपस्थित करणार आहे.
वृक्ष अधिकारी, आकाश चिन्ह विभाग काहीच करत नसल्याने होर्डींग चालकांचे धाडस वाढत चालले असल्याचे बोलले जात आहे. हे असेच चालू राहिले तर कोथरूडमध्ये रस्त्याच्या कडेने एकही झाड शिल्लक राहणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे.









