लढा पाषाण मधील बंद पडलेली शाळा सुरू करण्याचा ; स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाषाण : पाषाण मधील नेहरू शिक्षण संस्थेचे बंद पडलेले संत गोरा कुंभार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळा परिसरातील गरजू मुलांच्या शिक्षणासाठी पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामस्थ,माजी नगरसेवक, माजी विद्यार्थी, पालक यांनी एकत्र येत स्वाक्षरी मोहीम राबवली असून संबधित खात्याला निवेदन देत आपला पाठपुरावा सुरू केला आहे.
पाषाण गावातील नेहरू शिक्षण संस्थेची प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय बंद करण्याचा डाव संस्थाचालकांनी केला आहे. त्यामुळे पाषाणमधील विद्यार्थांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. संस्थाचालकांच्या या बेकायदेशीर कृतीचा निषेध करुन शाळा वाचविण्यासाठी सह्यांची मोहिम चालू केली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनी सांगितले.

पाषाण मधील शाळेच्या अस्तित्वासाठी लढा सुरू झाला आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मनोज सौनिक, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय डॉ. रणजितशिंग देवोल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक माध्य / व उच्य माध्यमिक/प्राथमिक शिक्षण, शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक जि.प.पुणे, प्रशासकीय आधिकारी शिक्षण मंडळ प्राथमिक विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना देण्यात आले आहे.
पाषाण गावातील नेहरू शिक्षण संस्थेच्या संत गोरा कुंभार अनुदानीत शाळेचे एक एक वर्ग बंद करून पूर्ण शाळा संस्था चालकांकडून हेतुपुरस्सर बंद करण्यात आली असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत चौकशी करून तातडीने चौकशी अहवाल तयार करावा अशी मागणी माजी नगरसेवक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालक यांच्याकडून निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.









