अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी मंत्र्यांना रोहित पवारांकडून अनोखी भेट

नागपूर : आज हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाला सुरुवात झाली . अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार रोहित पवार यांच्याकडून सत्ताधारी मंत्र्यांना अनोखी भेट देण्यात आली.
राज्यात सत्तेत असणाऱ्या मंत्र्यांकडून तसेच जबाबदार व्यक्तींकडून सातत्याने महापुरुषांचा कळत नकळत होणारा अपमान होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. पवार यांनी राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर येथील विधान भवनच्या आवारात सत्ताधारी लोकप्रतिनिधींना महापुरुषांची संपूर्ण माहिती अवगत होण्यासाठी महापुरुषांच्या माहितीच्या पुस्तकांचे वाटप केले.
पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, उदय सामंत यांसह इतरांना ही पुस्तके भेट दिली आहेत. वारंवार महापुरुषांबद्दल केल्या जाणाऱ्या अवमानकारक वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. महविकास आघाडीने नुकताच या प्रकारचा निषेध नोंदवण्यासाठी महामोर्चाचे ही आयोजन केले होते. या मोर्चाला संबोधित करताना शरद पवार यांनी राज्यपालांची पदावरून हकालपट्टी करा. लोक शांत आहेत पण त्यांची हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.




