फिरकीचा जादूगार शेन वॉर्न काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने याबाबत माहिती दिली आहे.

शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई बेटावर होता आणि तेथे त्याच्या व्हिलामध्ये राहत होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. पण मग या महान गोलंदाजाचे हे शेवटचे ट्विट असेल हे कोणास वाटले नव्हते.
शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये 700 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. वॉर्न हा जगातील महान स्पिनर मानला जात होता. त्याने जगातील प्रत्येक मैदानावर आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकून देणारी कामगिरी केली होती.
ऑस्ट्रेलियाच्या या महान गोलंदाजाने 2007 मध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 बळींचा टप्पा गाठणारा शेन वॉर्न हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. वॉर्नच्या नावावर कसोटीत 708 तर वनडेत 293 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.
शेन वॉर्नने आपल्या खेळाने जगाला जितके प्रभावित केले आहे तितकेच त्याच्या वादांमुळे क्रिकेट जगतात निराशा झाली आहे. 1998 मध्ये बुकीला माहिती दिल्याबद्दल वॉर्नला दंड ठोठावण्यात आला होता आणि 2003 च्या विश्वचषकाच्या काही दिवस आधी बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन केल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याच्यावर क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती.
1996 मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध वॉर्नने जोरदार गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलिया विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता.






