शैक्षणिक

ग्लोबल टिचर डिसले गुरूजींचा राजीनामा

सोलापूर : ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविला आहे. त्यांनी ७ जुलैला राजीनामा दिला असून तो गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडेही आला आहे. राजीनामा अर्जात त्यांनी काहीच कारण नमूद केलेले नाही.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, दोन वर्षांत ते ‘डायट’कडे फिरकलेच नाहीत. त्यांनी ग्लोबल टिचर ॲवार्डची तयारी करण्यातच तो कालावधी घालवला, अशी तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आणि त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला.

तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी चौकशी करून अहवाल तसाच ठेवला. विद्यमान शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी तो अहवाल पुन्हा उघडला आणि त्यांची स्वतंत्र चौकशी करून कारवाईची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली. तत्पूर्वी, त्यांनी अमेरिकेत फेलोशिपला जाण्यासाठी रजा मागितली होती. पण, अपूर्ण कागदपत्रांमुळे त्यांचा अर्ज तसाच प्रलंबित ठेवला होता. कागदपत्रांची पूर्तता न करताच त्यांनी रजा मागितली होती. पण, त्यावेळी त्यांच्या रजेचा विषय तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहचला आणि त्यांच्या आदेशाने डिसले गुरुजींना रजा मिळाली. त्याचवेळी त्यांनी शिक्षण विभागातील काहींनी माझ्याकडे पैसे मागितले, असा आरोपही केला होता. पण, त्यांना त्याचा पुराव्यानिशी खुलासा करण्याचे पत्र जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आले. त्यावेळी त्यांनी माफीनामा दिला होता. राजीनामा मागे घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Img 20220708 wa00011330202002021897215

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये