पुण्याची गुणसूत्रे जाणून घ्यायची असतील तर ‘हॅशटॅग पुणे’ हे पुस्तक जरूर वाचा : शरद पवार

पुणे : ज्या कोणाला पुण्याची नस आणि पुण्याची गुणसूत्रे जाणून घ्यायची आहे, त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे. या पुस्तकात पुण्याच्या अमृततुल्यपासून तर पुण्यात साजरा होणारा गणेशोत्सव, उरूस या सगळ्यांसह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आढावा घेतला आहे. हे पुस्तक म्हणजे पुण्याचे सर्वांगीण दस्तावेजीकरण आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
आज बालगंधर्व रंगमंदिरात अंकुश काकडे लिखित आणि उत्कर्ष प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘हॅशटॅग पुणे’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, गिरीश बापट, वंदना चव्हाण, उल्हास पवार, आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व्यासपीठावर उपस्थित होते.
पवार म्हणाले, पुणे झपाट्याने बदलत असून शैक्षणिक संस्था, आयटी हब, औद्योगिकीकरण, उद्योग आणि रोजगाराच्या संधी यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे हे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र बनत असून शैक्षणिक संस्थांद्वारे शिक्षणाच्या निमित्ताने विविध जाती-धर्माचे विद्यार्थी पुण्यात येतात. त्यांच्या बरोबरीने त्यांचे आचार-विचार आणि संस्कृतीही पुण्यात येत आहे.

पूर्वी पेन्शनरांचे पुणे म्हणून ओळखले जाणारे पुणे आयटी, शिक्षण आणि उद्योगाचे हब झालेले आहे. पुण्याने देशाला कायमच विचार देण्याचे काम केले आहे. परंतु, अलिकडे कमी होत चाललेली वाचन संस्कृती आणि कमी होत चाललेला साहित्य व्यवहार ही धोक्याची घंटा आहे. भौतिकदृष्ट्या समाज किती विकसित आहे, यापेक्षा वैचारिक, सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या समाज किती प्रगत आहे, यावर तो समाज किती पुढे जाईल हे ठरत असते. वाचन संस्कृतीची पाळेमुळे रुजलेल्या पुण्यात ललित साहित्याची उलाढाल प्रचंड मंदावलेली आहे. हातावर मोजण्याइतके ललित साहित्य विक्रेते पुण्यात तग धरून आहेत असे पवार म्हणाले.





















