कर्वेनगरमध्ये मांजात अडकलेल्या कबुतराची नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुटका ; अग्निशमन दलाने बजावले कर्तव्य

कर्वेनगर : पतंगाच्या मांजाला अडकून पक्षी दगावल्याच्या घटना अनेक वेळा घडत असतात. मांजा गळ्याला कपल्यामुळे अनेक जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. असाच एक प्रकार कर्वेनगर मधील मातोश्री कॉलनी येथील लक्ष्मी नारायण पार्क समोर घडला. पतंगाच्या मांजला अडकून तडफडत असलेल्या कबुतराला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले.
कर्वेनगरमधील मातोश्री कॉलनी येथील चौकात मांजात पाय अडकल्याने एक कबुतर हवेतच लटकले. कडक उन्हामुळे ते तडफडू लागले होते. हा प्रकार पाहिल्यानंतर स्थानिक नागरिक प्रतीक नलावडे, संतोष शेट्टी, राहुल पवार यांनी हा प्रकार अग्निशमन दलाला कळवला.
काही वेळातच वारजे अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली व त्यांनी बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन केंद्राचे फायरमन हर्ष भंडारे, अक्षय गायकवाड, तानाजी जाधव केंद्रे, नागवडे व चालक शेटे यांनी प्रयत्न करून जीवाच्या आकांताने तडफडत असलेल्या कबुतराची सुटका करत त्याचे प्राण वाचवले. कडक उन्हामुळे जीवाची काहीली झालेल्या कबुतराला पाणी पाजून सोडून देण्यात आले.

सतर्क नागरिक आणि कर्तव्य बजावणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांमुळे एका जीवाला आज जीवदान मिळाले. प्रतीक नलावडे व संतोष शेट्टी यांनी सांगितले की, अग्निशमन दलाला हा प्रकार कळवल्यानंतर या कारणासाठी ते वेळेत येतील का अशी शंका होती, पण वेळेत येऊन त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावल्यामुळे एका पक्ष्याचे प्राण वाचले. बचाव कार्यात उशीर झाला असता तर पक्षाचे प्राण वाचले नसते. म्हणून वेळेत येऊन कर्तव्य बजावणाऱ्या अग्निशमन दलाच्या कार्याला सलाम.






