शैक्षणिक

संयुक्त मुख्य परीक्षा २०२० चे वेळापत्रक एमपीएससीकडून जाहीर

पुणे : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा २०२० च्या उत्तरतालिकेसंदर्भातील याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून (मॅट)  फेटाळण्यात आल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. त्यात महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२०  संयुक्त पेपर क्रमांक १  ही परीक्षा ११  सप्टेंबरला, पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा २५  सप्टेंबरला, राज्य कर निरीक्षक पदासाठीची परीक्षा १५  ऑक्टोबरला, सहायक कक्ष अधिकारी पदासाठीची परीक्षा १६  ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. 

एमपीएससीतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा २०२० ची  उत्तरतालिका २५  नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या उत्तरतालिकेवर आक्षेप घेऊन काही उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे २९ जानेवारीला होणारी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने जाहीर केले होते. या याचिका तीनही खंडपीठांकडून फेटाळण्यात आल्याने  मुख्य परीक्षेचे वेळापत्रक एमपीएससीने जाहीर केले. मुख्य परीक्षेसाठी १०  डिसेंबर २०२१  रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील तरतुदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना नवीन प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल, असे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

न्यायालयीन प्रकरणामुळे मुख्य परीक्षा रखडल्याने उमेदवारांना मुख्य परीक्षा कधी होणार याची प्रतीक्षा होती. त्याबाबत उमेदवारांकडून मागणीही करण्यात येत होती. आता एमपीएससीने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. 

उत्तरतालिकेवरील आक्षेपांच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या न्यायालयीन प्रकरणांच्या कारणास्तव परीक्षेचे आयोजन स्थगित करण्यात आले होते. मात्र उमेदवारांनी उपस्थित केलेले सर्व आक्षेप न्यायाधिकरणाकडून फेटाळण्यात आल्याने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले, अशी माहिती एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली आहे.

Img 20220708 wa00011330202002021897215

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये