सोलापुरात कर्नाटक भवन उभारणार; दहा कोटी रूपये मंजूर

मुंबई : सोलापुरात कर्नाटक भवन उभारणार अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्बई (Basavaraj Bommai ) यांनी केली आहे. या कर्नाटक भवनसाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा देखील बोम्मई यांनी केली आहे.
बोम्मई यांनी कर्नाटकच्या सीमेलगत असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर हक्क सांगितल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पुन्हा उफाळला आहे. त्यातच हा वाद सुरू असल्यामुळे परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशारा बोम्मई यांनी दिला आहे. त्यानंतर त्यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभारणार असल्याची घोषणा केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील एका गावात विकासकामांच्या उद्घाटनासाठी बसवराज बोम्मई आले होते. यावेळी बोलताना बोम्मई यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा करून पुन्हा एकदा महाराष्ट्रला डिवचण्याचे प्रयत्न केले आहेत. सीमेपलीकडील जनता देखील आपलीच आहे. तेथील कन्नड शाळांचा विकास होत नसल्याने, तेथील शाळांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने कोणत्याही राज्यातील कन्नड शाळांना अनुदान देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. कन्नड रक्षण प्रधिकरणाच्या माध्यमातून सीमेपलीकडील कन्नड शाळांना अनुदान देण्यात येईल. त्यासाठी शंभर कोटींच्या अनुदानाची तरतूद करण्यात येईल. तसेच सोलापूरमध्ये कर्नाटक भवन बांधण्यासाठी दहा कोटी रूपये मंजूर केल्याची माहिती देखील बसवराज बोम्मई यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र, तेलंगना, तामिळनाडू, गोवा या राज्यांच्या सीमेवर असलेल्या 1800 ग्रामपंचायतींचा विकास करण्यासाठी प्लॅनिंग सुरु असल्याची माहिती देखील बोम्मई यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याची बोम्मई यांनी घोषणा केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोम्मई यांना प्रत्युत्तर दिले आहे. सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असला तर मग बेळगाव आणि बंगळुरुमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे सीमा भागावरून वाद सुरू असतानाच आता बोम्मई यांनी कर्नाटक भवनवरून पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याची घोषणा केली.



