तलवारबाजी केल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : जाहीर कार्यक्रमात तलवार काढल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी अस्लम शेख आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड हे एका कार्यक्रमात एकत्र असताना त्यांनी तलवार काढली होती. यावेळी त्यांच्यासोबत आणखी काही कार्यकर्ते देखील होते. तसंच यावेळी पोलीस देखील उपस्थित होते, तरीही त्यांच्याविरोधात लवकर गुन्हा दाखल होत नव्हता असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
मुंबई पोलिसांनी वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्या विरोधात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांनीही तलवार नाचवली होती आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोहित कंबोज यांनी या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल का नाही असा सवालही उपस्थित केला होता. तसेच पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक होताच मोहित कंबोज हे तलवार नाचवताना दिसून आले होते. याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोहित कंबोज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.




