भोर मतदार संघाच्या विकासावरून किरण दगडे पाटील यांनी साधला संग्राम थोपटेंवर निशाणा..

भोर मतदार संघाच्या विकासावरून केले मुद्दे उपस्थित
भोर विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून आता मतदार संघाचा विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भोर मतदार संघाचा विकास भकास झाला आहे असा आरोप करत भाजपचे इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी या भागातून तीन टर्म आमदार असलेले संग्राम थोपटे यांच्यावर निशाणा साधला आहे.
किरण दगडे पाटील यांनी भोर मतदार संघात येणाऱ्या भोर, वेल्हा, मुळशी परिसरात विकास कामे कशी झाली नाहीत, अनेक प्रश्न प्रलंबित कसे राहिले यावर भाष्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असतानाही महाराजांचा ऐतिहासिक वारसा जपण्यात आलेले अपयश, मतदार संघातील रोजगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, पर्यटन विकासाकडे करण्यात आलेले दुर्लक्ष, रस्त्यांची झालेली दुरवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुरवस्था, विकासाच्या दृष्टीने आवश्यक प्रकल्प राबवण्यात आलेले अपयश आदी मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.
भोर मतदार संघाच्या खुंटलेल्या विकासाबाबत किरण दगडे पाटील यांनी उपस्थित केलेले मुद्दे
१)१९९२ साली औद्योगिक वसाहत MIDC ची अधिसूचना जारी करण्यात आली ३२वर्षे झाली आजपर्यंत MIDC होऊ शकली नाही.
२)निरा देवघर धरण होऊन २४ वर्षे झाली आजही निरा देवघर डावा कालवा व उजवा कालवा अपुर्णावस्थेत आहे. ३)वेनवडी उपसा जलसिंचन योजना आजही अपुर्णावस्थेत आहे. भानुसदरा उपसा जलसिंचन योजना आजही अस्तित्वात नाही.
४)भाटघर धरण १९२८ साली झाले. धरणग्रस्त दाखले मिळायला २०१५ उजाडले इतके वर्ष प्रकल्प ग्रस्त बळीराजा व त्यांच्या पिढीला नोकरीत सूविधा आरक्षणावाचुन वंचीत रहावे लागले.
५) राजगड, तोरणा, रोहीडा, रायरेश्वर असे दुर्गराज असुन ही दळणवळणाच्या सुविधा अभावी पर्यटन वंचित राहीले.
६) रायरेश्वर मंदिरात महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ती भुमी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंदीराची आजही दुरावस्था.
७) स्वराज्याची शपथ भुमी, राजगड सारखी स्वराज्याची राजधानी आणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भोर वेल्हे तालुक्यात शिवसृष्टी नसावी ही खेदाची बाब म्हणावी लागेल.

८) भोर वेल्हे तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रकल्प आणण्यासाठी गेली १५ वर्षात कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना कृतीत आणण्यासाठी प्रयत्न नाहीत
९)भाटघर, निरा देवघर, चापेट गुंजवणी, वीर अशा चार धरणातून हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली गेली कित्येक वर्षे झाली बळीराजा देशोधडीला लागला पण त्याला स्वतःला शास्वत पाणी शेतीसाठी नाही.
१०) भोर वेल्हे तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या साठी औद्योगिक वसाहत स्थापन न झाल्याने युवक देशोधडीला लावले
११) अनेक कारखाने बंद झाले काही नवीन येणारे महाऊर्जा सारखे प्रकल्प पळवुन लावले.
१२) भोर तालुक्यातील रांगडा मावळी युवा वर्गासाठी भोर वेल्हे तालुक्यात साधे क्रिडा संकुल उभारता आले नाही.
१३) भोर वेल्हे तालुक्यातील पांडव कालीन व ऐतिहासिक मंदिरे रायरेश्वर, बनेश्वर, नागेश्वर मंदिर यांची गेली कित्येक वर्षे निधी उपलब्ध करून न दिल्याने व विकास आराखडा नसल्याने दुरावस्था झाली.
१४) भोर वेल्हे तालुक्यातील मंदीरांना “बं”वर्ग दर्जा देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत.



१५) भोर वेल्हे तालुक्यातील एस टी स्टँडची गेली कित्येक वर्ष दुरावस्था झालेली आहे. चिखल, राडारोडा, खड्डे, अस्वच्छता कचरा अशा अवस्थेत ही बस स्थानके आहेत.
१६) भोर तालुक्यातील युवकांना हिंजवडी आयटी पार्क मध्ये कोणत्याही प्रकारचे रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत.
१७) चार दुर्ग चार धरणे,अशी निसर्गाची किमया असताना सुद्धा भोर वेल्हे तालुका पर्यटनासाठी सुविधा उपलब्ध नाहीत म्हणून वंचित राहीला
१८) दरवर्षी पावसाळ्यात वरंधा घाट बंद केला जातो त्यामुळे पर्यटकांना असुविधेला सामोरे जावे लागते.
१९) अनेक सहकारी संस्था बंद पडलेल्या अवस्थेत आहेत किंवा काही असुनही त्या जर्जर झालेल्या आहेत.
२०) भोर तालुक्यातील अंतर्गत रस्ते व मुख्य रस्ते दर्जाहीन आहेत खड्ड्यांचे सर्वत्र साम्राज्य पसरले आहे.
२१) औद्योगिक वसाहत MIDC नसल्याने हाताला रोजगार नाही, शेती साठी शास्वत पाणी पुरवठा नाही म्हणून शेतीतून आर्थिक उन्नती व्हावी अशी परिस्थिती नाही भोर वेल्हे तालुक्यातील अंतर्गत दळणवळण निकृष्ट दर्जाचे असल्याने व असुविधा, असुरक्षितता असल्याने कोणत्याही प्रकारचा पर्यटन विकास नाही.
२२) शाश्वत विकास साधला गेला नसल्याने भोर वेल्हे तालुक्यातील जनतेची आर्थिक दृष्ट्या प्रगती खुंटली.
२३) भोर वेल्हे तालुक्यातील जनतेचे आर्थिक दृष्ट्या जिवनमान सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत, त्यामुळे जनता दिवसेंदिवस आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या पिचलेल्या अवस्थेमध्ये जाऊन देशोधडीला लागले आहे व स्थलांतर करीत आहे.
असे विकासाचे मुद्दे उपस्थित करत किरण दगडे पाटील यांनी आमदार संग्राम थोपटे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.









