संग्राम थोपटेंसमोर किरण दगडे पाटील यांचं तगडं आव्हान..
भोर विधानसभा मतदार संघ
अमोल साबळे
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदार संघात कशी लढत होणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. ग्रामीण, दुर्गम, निमशहरी भाग या मतदार संघात समाविष्ट आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यासमोर भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले किरण दगडे पाटील यांनी तगडं आव्हान उभा केल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
कोणताही राजकीय वारसा नसताना मतदार संघातील बावधन गावाचे सरपंच, पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक अशी आपली राजकीय कारकीर्द किरण दगडे पाटील यांनी गाजवलेली आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून भोर विधानसभा मतदार संघाकडे पाहिले जाते. संग्राम थोपटे हे गेली तीन टर्म या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. या आधी झालेल्या निवडणुकांमध्ये संग्राम थोपटे यांच्यासमोर कोणाचं तगडं आव्हान उभ राहीलं नाही, कारण निवडणुकीच्या काही दिवस आधी समोरचा उमेदवार तयारीला लागत, त्यामुळे विस्ताराने मोठा आणि शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भाग असलेल्या या मतदार संघात मतदारांपर्यंत पोहचणे त्यांना शक्य होत नसत आणि त्याचाच फायदा संग्राम थोपटे यांना मिळत आला आहे.
किरण दगडे पाटील मात्र मागील दोन वर्ष या मतदार संघात तयारी करत असून ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी गावागावात पोहचून आपली भूमिका मांडली आहे. विकासाची संकल्पना ते लोकांना सांगत आहेत. दोन वेळा पूर्ण ट्रेन बुक करून त्यांनी मतदार संघातील माता भगिनींना, ज्येष्ठांना पवित्र अशी काशी यात्रा घडवली आहे. या यात्रेच्या निमित्ताने किरण दगडे पाटील यांचे नागरिकांशी ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. या यात्रेमुळे आधुनिक काळातील श्रावण बाळ अशी उपाधी त्यांच्या नावापुढे लागली आहे. मतदार संघातील विविध भागात महिलांसाठी होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेणे असो किंवा दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रम ते सातत्याने मतदार संघातील नागरिकांच्या संपर्कात आहेत.
नुकत्याच भोर मधील किरण दगडे पाटील यांच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी विरोधकांना विचारात पाडणारी आहे. कारण याआधी अशा पद्धतीने काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांच्यासमोर निवडणुकीची तयारी कोणी केलेली नव्हती. त्यामुळं काँग्रेस समोर किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून एक आव्हान उभ राहील असल्याची चर्चा मतदार संघात आहे.
किरण दगडे पाटील संग्राम थोपटे यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील अनेक वर्ष या मतदार संघात आमदार म्हणून काम करत असलेले संग्राम थोपटे यांनी केलेल्या विकास कामांवर मतदार राजा किती खुश आहे हे निवडणुकीत कळेलच, पण किरण दगडे यांनी मात्र जोरदार तयारी करून आपले इरादे दाखवून दिले आहेत. संग्राम थोपटे आणि किरण दगडे पाटील यांच्यात सरळ लढत झाल्यास चुरशीची व रंगतदार लढत पहिला मिळेल असे बोलले जात आहे.
भोर विधानसभा मतदार संघात गेल्या वेळी काँग्रेस पक्षाचे संग्राम थोपटे आणि शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांच्यामध्ये लढत झाली होती. आता शिवसेनेचे दोन गट झाले असून ठाकरे गट महाविकास आघाडीत असून संग्राम थोपटे आमदार असल्याने हि जागा काँगेस पक्षाकडे राहणार आहे. मात्र महायुती मध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष या जागेवर दावा करीत आहेत. मात्र किरण दगडे पाटील यांच्या सारखा तगडा उमेदवार भाजप कडे असल्याने हि जागा भाजप स्वतः कडे ठेवण्यासाठी प्रयत्न करेल असे दिसत आहे.