अथर्वशीर्ष म्हणायला हजारो महिला जमतात पण सावित्रीबाईंनी जिथे शाळा सुरू केली तिथे कुणी नतमस्तक होत नाही; छगन भुजबळांना खंत

पुणे : दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी हजारो महिला स्वयंस्फूर्तीने जमा होतात. परंतु, त्याच मंदिरासमोरील भिडे वाडा येथे माथा टेकण्यासाठी कोणीही जात नाही. शिक्षण देणाऱ्या सावित्रीबाई यांच्यापेक्षा दोरे गुंडाळण्यासाठी सावित्री महिलांना महत्त्वाची वाटते, अशी खंत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते यशवंत मनोहर यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी भुजबळ बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी खासदार पंकज भुजबळ, माजी आमदार कमल ढोले-पाटील, लेखक हरी नरके, परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे या वेळी उपस्थित होत्या. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आपले समाज बांधवच एकत्र येत नाहीत, अशी खंत व्यक्त करून भुजबळ म्हणाले, ६ डिसेंबरला मुंबईत लाखोंच्या संख्येने पोहोचणाऱ्या अनुयायांना आपल्या महामानवाला वंदन करा, हे सांगावे लागत नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी रायगडावर मोठ्या संख्येने शिवभक्त जमतात, त्यांना देखील सांगावे लागत नाही. मग ओबीसी समाजातील लोकांमध्ये ही उदासीनता का दिसून येते, हे कोडे मला न सुटणारे आहे.
कुठे घेऊन चाललो आपण शिक्षण
सरकार कोणाचेही असो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधित कोणताही विषय असला, तरी त्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. महात्मा फुले वाडा ते सावित्रीबाई फुले सभागृह हा रस्ता जोडून का मिळत नाही, हा देखील प्रश्न आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमाध्ये अथर्वशीर्षाचा समावेश केला आहे. मग केवळ गणपतीच का, ३३ कोटी देव आहेत. त्यांनाही अभ्यासक्रमात घ्या, अशी उपरोधिक टीका करून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ‘कुठे घेऊन चाललो आपण शिक्षण’ असा सवाल उपस्थित केला.
भुजबळ म्हणाले, ‘अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यासाठी कोणतीही अभ्यास समिती अस्तित्त्वात नाही. अधिसभा अजून अस्तित्वामध्ये यायची आहे. प्रभारी कुलगुरुंना अभ्यासक्रम ठरविण्याचा अधिकार नाही. असे असताना खुशाल तुम्ही त्याला श्रेयांक देणार. आपण कुठे घेऊन चाललो आहे हे सगळे? सगळ्या धर्मात अशा काहीतरी गोष्टी असतील त्याही अशाच शिकवाव्या लागतील.
विज्ञान, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, माहिती-तंत्रज्ञान आता शिकायचे नाही का? यातून मन:शांती मिळणार आहे का? त्यासाठी प्राणायाम करा. योगा करा. प्रत्येकाने आपापल्या घरात ते करावे, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला. मंत्रालयात फुले दांपत्याच्या तैलचित्राचे अनावरण केल्यानंतर भिडे वाड्याच्या प्रश्नाबाबतही लवकर बैठक घ्या, अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यावर एक महिन्यात ते काय निर्णय घेतील ते पाहू, अन्यथा आंदोलन तर आम्ही करणारच, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. त्या सगळ्यांना फाटा देण्यासाठी, त्यावर पांघरूण टाकण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ सारखे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपमानास्पद वाक्ये बोलून धर्मांमध्ये भांडणे लावली जात आहे. त्यात जनतेला गुंतवून ठेवले जात आहे, असा आरोप भुजबळ यांनी केला.
केंद्र आणि राज्यातील सरकार आपल्या मूर्खांपणाच्या बळावर आहे, असे भाष्य ज्येष्ठ कवी डाॅ. यशवंत मनोहर यांनी केले. मनोहर म्हणाले, मी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांची तत्वे घेऊन जगणारा मनुष्य असून त्यांच्या विचारांशी फारकत घेऊन मी कुठलेही पुरस्कार स्वीकारणार नाही. या सगळ्या महापुरूषांच्या विचारांनी मी भारावून गेलो असून ज्या व्यासपीठावर यांच्या प्रतिमा लावल्या जाणार नाहीत, ते व्यासपीठ माझे नव्हे. यासाठी कोट्यावधींचे पुरस्कार, मानसन्मान मला नाकारावे लागले तरी मी ते नाकारेन.
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले. पण, विद्यापीठाच्या बोधचिन्हामध्ये त्यांचे चित्र नाही. अथर्वशीर्ष हा अभ्यासाचा विषय घेतला. पण, महात्मा फुले यांचे अखंड स्वीकारले नाही. भिडे वाड्याचे स्मारक आणि मजूर अड्ड्याच्या जागेवर मजूर भवन होत नाही. भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक कारण्याचा निर्णय झाला नाही तर १ जानेवारीपासून सत्याग्रहाची वाट धरून तुरुंगवारी करावी लागेल, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव म्हणाले.