मेट्रो पुलाच्या पिलर वरती जाहिराती करून विद्रुपीकरण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा : संदीप खर्डेकर

पुणे : मेट्रो सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत, मात्र लगेच मेट्रोच्या पुलाच्या पिलर वरती जाहिराती करण्यास काही महाभागांनी सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे मेट्रोच्या पिलरचे विद्रुपीकरण होत असून मेट्रो व महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
या संदर्भातले निवेदन मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित व पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना खर्डेकर यांच्या वतीने देण्यात आले आहे.
पुण्यात आपण सर्रास पाहतो की, रस्त्याकडेच्या भिंती, एम एसीबीचे लाल बॉक्स, सोसायट्यांचे गेट असे अनेक ठिकाणी जिथे शक्य असेल तिथे आगदी झडावरही जाहिराती चिटकवल्याचे आपण पाहतो या प्रकारामुळे अनेक ठिकाणी बकालपणा आल्याचे दिसून येते. आता यातून मेट्रोचे पिलर ही सुटू शकले नाहीत.
खर्डेकर म्हणाले, आज सकाळी कर्वे रस्त्यावरून येताना मेट्रोच्या पिलरवर काही ठिकाणी फ्लेक्स तर काही ठिकाणी जाहिराती चिटकवलेल्या दिसल्या. स्वातंत्र्य चौकात भाषण कला शिका म्हणून एकाची जाहिरात फोन नंबर सह चिटकवलेली आहे, तर काही ठिकाणी फ्लेक्स ही दिसून आले. हे विद्रुपीकरण त्वरित रोखले नाही तर भावी काळात ह्या सुंदर प्रकल्पाची वाट लागेल आणि जाहिरातीचे हे लोण मेट्रो स्थानक आणि डब्यापर्यंत पोहोचेल.
त्यामुळे अतिक्रमण व आकशचिन्ह विभागाने केवळ ह्या जाहिराती काढणे एवढ्यावर न थांबता त्यांच्यावर कठोर दंडात्मक व गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी अशी आग्रही मागणी खर्डेकर यांनी केली आहे.




