सिंहगड रस्त्यावरील नाले होणार रुंद ; माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी केली पाहणी..

सिंहगड रस्ता : pune city सिंहगड रस्त्यावरील पाटील हॉस्पिटल जवळ सुरू असलेल्या पावसाळी पूर्व कामांची मंगळवारी माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी पाहणी केली. या परिसरात असलेल्या ओढ्यावर कल्व्हर्टचे काम महानगरपालिकेने सुरू केले आहे, याची नागपुरे यांनी पाहणी करत कामाचा आढावा घेतला.
गेल्या दोन वर्षापासून शहरात पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वात अधिक फटका सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना बसला आहे. पावसाळयात या परिसरातील इमारतींच्या संरक्षक भिंती कोसळणे, दुकाने, रुग्णालयांमध्ये पावसाचे पाणी शिरणे, गाळ साचणे, गाड्या वाहून जाणे असे प्रकार या भागात काही तासांत झालेल्या पावसामुळे घडलेले आहेत.
या भागात असलेल्या खोराडवस्ती, रोकडोबा मंदिर, विठ्ठलवाडी, विठ्ठलनगर, पाटील हॉस्पिटल, मधुकर हॉस्पिटल, संतोष हॉल या सर्व ठिकाणी गेल्या पावसाळयात पाण्याचे मोठे लोट वाहत होते. पाणी वाहून जाण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने उतारावरचे आणि ओढ्याचे पाणी बहुतेक घरांमध्ये, दुकानांत तसेच मधुकर आणि पाटील रुग्णालयात घुसले होते. परिणामी नागरिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
या घटनेची पुनरावृत्ती यंदाच्या पावसाळ्यात होऊ नये यासाठी या परिसरात असलेल्या सर्व ओढे, नाले यांची स्वच्छता करून त्यांची रुंदी आणि खोली वाढवावी, अशी मागणी नगरसेविका नागपुरे यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. तसेच याचा सतत पाठपुरावा देखील त्यांनी ठेवला होता. या भागात असलेल्या ओढ्यांवर नवीन कल्व्हर्टचे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यापैकी सिंहगड रस्त्यावरच्या प्रचंड वाहतुकीमुळे पाटील हॉस्पिटल जवळच्या ओढ्यावर कल्व्हर्ट बांधणे खूप अवघड झाले होते. मात्र सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे आता या कामाला गती मिळाली, असल्याचे नागपुरे यांनी सांगितले.

पालिकेच्या वतीने पाटील हॉस्पिटल जवळ सुरू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली. हा ओढा अधिक खोल आणि रुंद करावा, जेणेकरून पावसाळ्यात याचा फटका नागरिकांना बसणार नाही, अशी मागणी नागपुरे यांनी केली. हे काम पूर्ण झाल्यानंतर अस्तित्वात असलेला तीन मीटर रुंद ओढा ५ ते ६ मीटर रुंद होणार आहे. तसेच किमान १० फूट खोल होणार असल्याचे नगरसेविका नागपुरे यांनी स्पष्ट केले. यावेळी पालिकेतील अभियंता सुप्रिया वळसे पाटील, उपअभियंता दिलीप पांदकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.



