पुणे शहर

‘अभी नही तो कभी नही’ ; नेत्यांबरोबर कार्यकर्तेही राजकीय समीकरणे जुळवण्यात व्यस्त..

पुणे : Pune पुणे महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. प्रभागरचना अनपेक्षित झाली असल्याने अनेक इच्छुकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. तर महिला-पुरुष आरक्षण जाहीर झाले नसल्यानेही प्रत्येक जण संभ्रमावस्थेत दिसून येत आहे. परंतु ‘अभी नही तो कभी नही’ या भूमिकेत कार्यकर्ते असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची मानसिकता त्यांनी केल्याचे पहायला मिळत आहे.

विद्यमान नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून गाठीभेटी घ्यायलाही सुरुवात केली आहे. आरक्षण कसे पडेल त्यानुसार पॅनल कसा तयार करायचा याची रणनीती ही त्यांच्याकडून सुरू आहे, त्यानुसार गुप्त बैठका पार पडत आहेत व त्याची चर्चाही राजकीय वर्तुळात उमटत आहे. विद्यमान नगरसेवकांच्या या हालचाली सुरू असताना यात सर्वसामान्य कार्यकर्ता ही मागे नसून तो त्याच्या पातळीवर राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न करत आहे.

कार्यकर्त्यांनी बंड केले तर नगरसेवकांसमोर मोठा पेच निर्माण होणार आहे. पक्षाच्या नेत्यांना निवडून देण्यासाठी आणखी किती वर्ष खस्ता खायच्या अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. नागरिकांच्या अडचणींना धावून जाणे, समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणे, विविध समाज हिताचे उपक्रम राबवणे अशा प्रकारची अनेक कामे सामान्य कार्यकर्त्या सातत्याने करत असतो. एवढे करूनही शेवटपर्यंत पक्षाकडून विचार होईल की नाही सांगता येत नाही. पक्ष आपल्याला संधी देईल का अशा विवंचनेत सध्या हे कार्यकर्ते असून ही निवडणूक काही झाले तरी लढवायची असा चंग बांधून सर्व पक्षातील कार्यकर्ते मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत.

अनेक जणांकडून सोयीच्या राजकारणासाठी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले जाते किंवा पक्षाकडून आयात उमेदवार लादले जातात. आयात होऊन आलेल्या उमेदवारांमुळे पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होत असतो. अशा वेळेस त्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करताना पक्षश्रेष्ठींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या नेत्यांच्या हालचालीचा अंदाज घेऊन कार्यकर्ता आपली राजकीय गणिते तयार करू लागला आहे.

पक्षाची उमेदवारी ऐनवेळेस दुसऱ्याला जाण्याचा अनुभव कार्यकर्त्यांना काही नवा राहिलेला नाही त्यामुळे कार्यकर्ता सावधानता बाळगून आपले पत्ते वापरत आहे. कामाला लागा असे प्रत्येकाला जरी सांगितले गेले असले तरी उमेदवारीची माळ गळ्यात कोणाच्या पडणार याबाबत शंका कार्यकर्त्यांच्या मनात अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असते कारण शेवटच्या क्षणीही काही धोका होऊ शकतो याची त्याला कल्पना त्याला असते. निवडणुकांचे काम करत असताना असे प्रकार त्यांनी अनेकवेळा पाहिले आहेत. अनेक कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक म्हणजे शेवटची संधी असणार आहे त्यामुळे थांबण्याच्या मनस्थितीत कार्यकर्ते नसल्याचे दिसत आहे.

अमोल साबळे
Editor- सिंहासन News

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये