महापालिकेच्या रस्त्याच्या टेंडर प्रक्रियेवर आक्षेप.. करोडोंच्या टेंडरसाठी ७ दिवसांचा वेळ ; नक्की चाललंय तरी काय?

पुणे : पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ अंतर्गत पुणे महानगरपालिका पथ विभागाच्या माध्यमातून रस्त्याची कामे केली जाणार असून त्यासाठी राबवण्यात आलेल्या पॅकेज निविदा कार्यप्रणाली संदर्भात आक्षेप घेतला जात आहे. या निविदा प्रक्रियेत रिंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र दिले असून या निविदा प्रक्रियेतील मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.

पत्रात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे
१) पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ पथ विभागाच्या पॅकेज निविदा कालावधी बाबत सुधारित निविदा कार्यप्रणालीनुसार ₹२५ कोटी ते ₹१०० कोटी पर्यंतच्या कामांसाठी किमान ४५ दिवसांचा कालावधी देणे आवश्यक आहे. तथापि, सदर निविदेसाठी फक्त ७ दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. इतका अल्प कालावधी ठेवण्याचे कारण काय आहे? यामुळे निविदा प्रक्रिया पारदर्शक व स्पर्धात्मक राहील का? निविदा अटी अशा प्रकारे घाईघाईने ठेवणे म्हणजे विशिष्ट ठेकेदारांसाठी जाणीवपूर्वक संधी निर्माण करण्याचा संशय निर्माण होतो.
२) कामाच्या मुदतीबाबत (पावसाळ्यातील कामे)
सदर कामाची मुदत फक्त २ महिने ठेवण्यात आली असून त्यातही १.५ महिना पावसाळ्याचा कालावधी आहे. पावसाळ्यात डांबरी व काँक्रिट रस्त्यांची कामे दर्जेदारपणे करणे शक्य आहे का?
अशा वेळी केलेली कामे टिकतील का? मागील पॅकेजमधील ₹२५० कोटींच्या निविदेसारखेच दर्जाहीन व गैरप्रकार या निविदेतही होण्याची शक्यता आहे.
३) नियोजित रस्त्यांची यादी व दोषदायित्व
सदर निविदेत कोण कोणते रस्ते समाविष्ट आहेत, याची संपूर्ण यादी सार्वजनिक करण्यात यावी. याच रस्त्यांवर मागील पॅकेजमध्ये कामे झाली होती का? जर झाली असतील, तर अजूनही दोषदायित्व कालावधी (Defect Liability Period) लागू आहे. अशा परिस्थितीत नवीन निविदा काढण्याऐवजी मागील ठेकेदारासच दुरुस्ती करण्यास का भाग पाडले जात नाही? दोषदायित्व कालावधीतील जबाबदारी न घेता नवीन खर्च करणे म्हणजे नागरिकांच्या कररकमेचा अपव्यय होय.



या अटींमुळे ठराविक तीन ते चार जणांच्याच निविदा आल्या आहेत आमच्या माहितीप्रमाणे हे टेंडर मॅनेज झाल्यासारखे वाटते या कामाबाबत एकंदर किती निविदा आल्या होत्या ते जाहीर करावे यामध्ये मागील झाडण कामाच्या निविदेप्रमाणेच रिंग झाल्याचा आम्हाला संशय येतोय वरील सर्व बाबींचे स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात यावे. अन्यथा ही निविदा रद्द करून सुधारित निविदा कार्यप्रणालीप्रमाणे योग्य कालावधी, पारदर्शक प्रक्रिया व दर्जेदार कामे सुनिश्चित करण्यात यावीत अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ पॅकेज अंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचा विकास करणे कामासाठी महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद नाही. या नावाने हेड देखील नाही. वर्गीकरण करून हे पैसे उपलब्ध होणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा पुण्यात होत आहे त्यामुळे पुण्याचा नाव हे जगभर जाईल याविषयी आमचा विरोध नाही हे स्पष्टपणे नमूद करू इच्छितो परंतु यामध्ये पैसे जातील आणि रस्ते चांगले होणार नाहीत अशी भीती आम्ही या व्यक्त करतो याबाबत आपण योग्य ती खबरदारी घ्याल अशी अपेक्षा आयुक्तांना देण्यात आलेल्या पात्रात व्यक्त करण्यात आली आहे.






