राष्ट्रीय

केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 6 कामगारांचा जागीच मृत्यू

अहमदाबाद : भरूच शहरातील एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 6 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच एक कामगार बेपत्ता असल्याचे समजते. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या बेपत्ता कामगाराचा शोध सुरू आहे. 

भरूच येथे ओम ऑर्गेनिक या केमिकल कंपनीत अचानक स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचल्यानंतर स्फोटात 6 कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याचं लक्षात आलं. काही वेळानंतर भरूच येथील पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले कामगार रिअॅक्टरच्या जवळ काम करत होते, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.

भरूचमध्ये याआधीही अनेकदा केमिकल कंपन्यामध्ये स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जीआईडीसीतील एका कंपनीत सप्टेंबर 2021 मध्येही झालेल्या एका दुर्घटनेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा एकदा केमिकल कंपनीत स्फोट झाल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून अशा दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून काही उपाययोजना केल्या जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये