शैक्षणिक
पेपरचे गठ्ठे व्हायरल करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार

मुंबई : दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे त्यातील पत्त्यासह सोशल मीडियावर पाठवणे, हा परीक्षा आणि त्यासाठी असलेल्या गोपनीयतेचा भंग करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विनाअनुदानित शाळा कृती समिती आदी संघटनांकडून दहावी, बारावीच्या पेपरतपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक शाळांमध्ये पेपरतपासणीचे गठ्ठे मोठ्या प्रमाणात पडून असल्याची माहिती संघटनेकडून दिली जात आहे. त्यात काही जिल्ह्यातील शिक्षकांनी आपल्याकडे आलेल्या पेपरतपासणीचे गठ्ठे त्यावर लिहिण्यात आलेल्या शाळांच्या पत्त्यासह फोटो काढून व्हायरल केले असल्याने याविषयी राज्य शिक्षण मंडळाकडून गंभीर दखल घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.




