पुणे महापालिका निवडणूक : मला न विचारता राजकीय बॅनर वर माझा फोटो का घेतला ? यावरून वाद

पुणे : पुणे शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवारांकडून राजकीय समर्थन दाखवण्यासाठी मंडळांचे तरुण कार्यकर्ते यांचे फोटो अनेकदा राजकीय पाठिंब्यासाठी वापरले जातात. परंतु यातील अनेक तरुणांना आपल्या फोटोचा वापर केला जात असल्याचे देखील माहीत नसते. यामुळे ती व्यक्ती त्या राजकीय पक्षाच्या विचारांची नसली तरी संभ्रम निर्माण केला जात आहे.
राजकीय समर्थनासाठी लावले जाणारे वाढदिवसाचे नेत्यांच्या स्वागताचे बॅनर व त्यावर असणारे फोटो यावरून मंडळांच्या कार्यकर्त्यांना मध्ये वाद पाहायला मिळत आहेत.एकदा मंडळाला भरभक्कम वर्गणी देऊन मंडळातील कार्यकर्त्यांचे फोटो त्यांची पूर्व परवानगी न घेताच वापरले जातात. मंडळातील कार्यकर्ते गृहीत धरून वापरले जाणारे हे फोटो वादाचे कारण ठरत आहेत.
गणपती मंडळाचे अहवाल तसेच सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त छापण्यात आलेले बॅनर यावरील फोटो घेऊन राजकीय समर्थन दाखवण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
क्रीडा संघ तसेच बचत गटांच्या महिला तसेच गणपती मंडळांचे कार्यकर्ते यांचे फोटो सर्रास वापरण्याचा ट्रेंड पाहायला मिळत असून या कार्यकर्त्यांचा नेत्याला समर्थनासाठी आर्थिक आमिषे दाखवून त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सर्रास होताना दिसत आहे.
आपल्या फोटोचा गैरवापर होणार नाही तसेच समाजातील नागरिकांची दिशाभूल यानिमित्ताने होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.तसेच फोटोचा गैरवापर होऊ नये यासाठी वेळीच तक्रार देखील आवश्यक आहे.
