‘एसटी’त सवलतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ बंधनकारक; काढण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी ‘स्मार्ट कार्ड’ बंधनकारक करण्याचे ठरवले आहे. हे ‘स्मार्ट कार्ड’ काढण्यासाठी आता ३० जून २०२२ ही मुदत देण्यात आली आहे. ‘स्मार्ट कार्ड’शिवाय 1 जुलै 2022 पासून ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही सवलत मिळणार नाही. राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांपैकी 20 टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांकडे ‘स्मार्ट कार्ड’ नसल्याचे समोर आले आहे.
‘स्मार्ट कार्ड’ घेतल्यास ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या तिकीट दरात प्रवास करता येतो. एसटी बसमधून अल्प दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आता पास ऐवजी महामंडळाकडून आधार क्रमांकाशी संलग्न असणारे अत्याधुनिक स्मार्ट कार्ड दिले जात आहे. स्मार्टकार्ड नसेल, तर सवलतीच्या दरात ज्येष्ठांना प्रवास करता येणार नाही, असे एसटीकडून जाहीर करण्यात आले आहे.
‘स्मार्ट कार्ड’ कसे काढायचे..?
- ज्येष्ठ नागरिकांनी आधार कार्ड, तसेच ज्येष्ठ नागरिक असल्याचा दाखला सोबत घेऊन एसटी आगारात जावे लागेल..
- ज्येष्ठ नागरिकांच्या अंगठ्याचा ठसा स्कॅनरवर घेतला जाईल..
- आधारकार्डाशी संलग्न माहिती प्राप्त झाल्यावर नागरिकांची नावनोंदणी केली जाईल व स्मार्टकार्ड दिले जाईल.
- प्रवास करताना स्मार्ट कार्डाशिवाय इतर कोणतीही कागदपत्रे दाखविण्याची गरज भासणार नाही.
‘स्मार्ट कार्ड’ नसल्यास तिकिटाचे संपूर्ण पैसे भरुनच 1 जुलै 2022 पासून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करावा लागणार आहे.







