पुण्याचीही तुंबई? पुण्यात पाऊसाचा धुमाकूळ, पुणे महापालिका प्रशासन करतय काय? कर्वे रस्ता, सिंहगड रस्त्याला नदीचे स्वरूप

पुणे : शनिवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने पुण्यातील रस्त्यांवर पाणीच पाणी साठले. कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता सोबत अनेक ठिकाणी रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे झालेल्या मोठ्या वाहतुक कोंडी मध्ये पुणेकरांचे प्रचंड हाल झाले. मुंबई शहराप्रमाणे पुण्यातील सर्व भागात निर्माण झालेली परिस्थिती पाहता पुण्याची मुंबई झाली आहे का? असा सवाल पुण्यातील नागरिक उपस्थित करीत आहेत.
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसात रस्त्यावर साठलेले पाणी दूर करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा अपुरी पडताना दिसत आहे. तर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस देखील उपस्थित नसल्याचे चित्र आहे. नागरिकच चौका चौकात थांबून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र पुणे शहरात पहायला मिळाले.
पुणे शहरात आज पडलेला पाऊस ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस होता. मात्र या पुर्वी देखील अशा प्रकारे मोठा पाऊस पुण्यात सातत्याने पडतो. आणि पाऊसाचा पाण्यामुळे रस्ते बंद होतात. याची पुणे महापालिकेला कल्पना आहे.मात्र पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने याबाबतीत कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नसल्याचे आजच्या घटनेतून प्रतिबिंबित होत आहे.
कोथरूड भागातील कर्वे रस्ता असेल, पौड रस्ता असेल, किंवा एरंडवणे परिसर, सिंहगड रस्ता परिसर, बावधन, भुसारी कॉलनी,औंध सिंध सोसायटी परिसर या परिसरात पाऊसामुळे झालेली परिस्थिती पाहता या पुण्याला वाली आहे की नाही असा सवाल पुण्यातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

गणेश नगर मध्ये ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात
एरंडवणे भागातील गणेश नगर मध्ये अनेक नागरिकांच्या घरात पाऊसाचा पाण्यासोबत ड्रेनेज चे पाणी शिरले. ड्रेनेज वाहिनी फुटली असल्या बाबतीत स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे चार महिन्यांपासून तक्रार केली होती मात्र प्रशासनाच्या वतीने दखल घेतली नसल्याने आज हि परिस्थिती निर्माण झाली आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे.



























