राज ठाकरेंकडून योगी आदित्यनाथ यांचे कौतुक

पुणे : उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
उत्तर प्रदेशात ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. राज्यभरामध्ये धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवणे तसेच त्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित करण्याची मोहीम हाती घेण्यात आलीय. याच अंतर्गत एकूण १० हजार ९२३ भोंगे हटवण्यात आलेत. तर ३५ हजार २२१ भोंग्यांच्या आवाजाला मर्यादा घालून देण्यात आली, असं अतिरिक्त निर्देशक सचिव (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी म्हटलंय.
मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विषयासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक मान्यतांचं पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र त्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे, असं मत व्यक्त केलं. भोंगे वापरण्याला हरकत नाही. मात्र भोंग्यांचा आवाज त्या धार्मिक स्थळांच्या आवारापुरता मर्यादित राहील याची काळजी घ्या. याचा इतर लोकांना काही त्रास होता कामा नये, असं ते म्हणाले.
योगी सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावरुन व्यक्त होताना राज यांनी एक पोस्ट केली. यामध्ये राज यांनी, “उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थलांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार,” असं म्हटलंय. पुढे बोलताना राज यांनी, ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. “आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!”, असं म्हटलंय. तर पोस्टच्या शेवटच्या ओळीत राज यांनी, “महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना,” असंही म्हटलं आहे.
दरम्यान, मथुरेमधील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराने रोज पहाटे पाच वाजता भोंग्यावरुन म्हटली जाणारी मंगल चरण आरती भोंग्यावर न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊमधील इदगाहचे इमाम असणाऱ्या मौलाना खलिद रशिद फिरंगी महाली यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सर्व सुन्नी मशिदींना भोंग्यांचे आवाज कमी करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितले आहे.




