संजय राऊत म्हणतात चंद्रकांतदादा निष्पाप, निर्मळ मनाचे पण…

मुंबई : चंद्रकांतदादा निष्पाप आहेत. स्वच्छ हृदयाचे आहेत. निर्मळ मनाचे आहेत. त्यांच्या भावना मी समजू शकतो. राज्यातील आघाडी सरकार (maharashtra government) पडत नसल्याने त्यांना नैराश्य आलं आहे. त्यामुळे ते असं बोलत असतात. त्यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा येत्या 10 मार्च नंतर राज्यातील आघाडी सरकार कोसळणार असल्याचा पुनरुच्चार केला. पाच राज्यांतील निवडणुका झाल्यानंतर ठाकरे सरकारही जाईल, असं पाटील म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांतदादा सरकार पाडण्याच्या तारखा देत राहतील, त्याविषयी वाईट वाटत नाही. गेल्या दोन वर्षापासूनचा त्यांच्यावरचा प्रसंग समजू शकतो. दादांविषयी मला पूर्ण सहानभूती आहे. दादा किंवा त्यांचा पक्ष असेल. ते फार निष्पाप, स्वच्छ हृदयाचे, निर्मळ मनाचे आहेत. त्यांचा प्रयत्न असतो सरकार पाडण्याचा पण सरकार पडत नाही. त्यातून नैराश्य येतं. मग पुढची तारीख देतात. 10 मार्च नंतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका येतील. त्यानंतर सरकार पडेल, असं आता ते म्हणाले. या आधी पश्चिम बंगालच्या निवडणुका होत्या. त्यानंतर सरकार पडणार असं म्हणाले होते. सरकार पाडण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले पाहिजे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरू आहेत. कारण त्यांच्याकडे दुसरं काही नाही. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी माझ्या त्यांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा आहेत. त्यांनी त्यांची हत्यारे वापरावीत, असे राऊत म्हणाले.
आम्हाला पाडता पाडता ते स्वत: पडले. त्यांच्यावर काय आभाळ कोसळले. ते मला माहीत आहे. तामिळनाडूच्या निवडणुकीनंतरही सरकार पाडणार होते. तेही होऊ शकलं नाही. पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. आम्ही गोव्यातून आलो. आता यूपीत जाणार. आदित्य ठाकरेही यूपीत जाणार आहेत. उत्तर प्रदेशात खिचडी पकत नाही. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव पुढे आहेत. गोव्यात खिचडी आहे. पण काँग्रेस थोडं पुढे आहे. पण टक्कर आहे. गोव्यात देवेंद्र फडणवीस ठाण मांडून आहेत. पण जमिनीवरचं चित्रं वेगळं आहे. मी कुणाविषयी बोलत आहे हे फडणवीसांना माहीत आहे, असा निशाणा त्यांनी फडणवीसांवर साधला.



