महात्मा फुले टाटांपेक्षाही श्रीमंत होते अन् तुम्ही त्यांना भिकारी म्हणताय; चंद्रकांत पाटलांवर संजय राऊत संतापले

मुंबई: महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून नव्हे तर लोकवर्गणीतून संस्था उभारल्या होत्या. पण भाजपचे नेते महाराष्ट्राच्या या दैवतांना भिकारी म्हणतात. ज्योतिबा फुले हे त्याकाळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांचं उत्पन्न टाटांपेक्षाही जास्त होते, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला.
चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागताना संजय राऊत यांनी म्हटले की, ज्या पक्षाचे नेते शिवाजी महाराजांचा अपमान करतात, त्यांना आदर्श मानत नाहीत, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतात, त्याच वंशातून चंद्रकांत पाटील आले आहेत. हे म्हणजे अकलेचे कांदे आहेत. ज्योतिराव फुले हे त्या काळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, ही बाब या लोकांना माहिती नाही. टाटांचं उत्पन्न २० हजार होते, तेव्हा ज्योतिराव फुले यांचे उत्पन्न २१ हजारांच्या घरात होते. त्यांनी हा पैसा दानधर्म आणि दलितांसाठी शाळा आणि महाविद्यालये उभारण्यासाठी वापरला. या सगळ्याची इतिहासात नोंद आहे, पण चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या भाजप नेत्यांना ही गोष्ट माहिती नाही. त्यामुळे हे लोक महाराष्ट्राच्या दैवतांना कधी भिकारी तर कधी माफीवीर म्हणतात. हे आमचे राज्यकर्ते आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.







