पुण्यात विज्ञान चित्रपट महोत्सव

पुणे : पुण्यातील ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवनतर्फे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान विज्ञान चित्रपट महोत्सवाचे (सायन्स फिल्म फेस्टिव्हल) आयोजन करण्यात येणार आहे.
यातील पहिले सत्र शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. या सत्रात तीन लघुपट दाखवले जाणार आहेत. जैव विज्ञान आणि तंत्रज्ञान, विज्ञान आणि पर्यावरण अशा विषयांवरील जपान, जर्मनी आणि डेन्मार्कच्या लघुपटांचा यामध्ये समावेश आहे. १६ वर्षांवरील सर्वांसाठी हा महोत्सव विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवनतर्फे देण्यात आली आहे.

या महोत्सवात शालेय विद्यार्थांना विज्ञान विषयाशी संबंधित चित्रपट दाखवण्याबरोबरच इतर उपक्रमही हाती घेण्यात येणार आहेत. पुण्यासह दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता येथे ग्योथं इन्स्टिट्यूटतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


