डावी भुसारी काॅलनी, वेदभवन ते वारजे सर्व्हिस रस्त्यावर सुरक्षित वाहतुकीसाठी उपयोजना करण्याची मागणी..

माजी नगरसेविका अल्पना वरपे यांच्याकडून प्रकल्प संचालकांना निवेदन
कोथरूड : डावी भुसारी कॉलनी, वेदभवन येथून वारजेकडे जाण्यासाठी महामार्गाच्या कडेने करण्यात आलेल्या सेवा रस्त्यावरील (सर्विस रोड) वाहतूकीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. परंतु या सेवा रस्त्यावर वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने बेशिस्त वाहतूक होऊन अपघात घडतं आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचे योग्य ते नियोजन तातडीने करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदन वरपे यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांना देण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी डावी भुसारी कॉलनी, वेदभवन मंदिर ते वारजे असा सेवारस्ता (सर्विस रोड) व्हावा यासाठी अल्पना वरपे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. आता हा सेवा रस्ता पूर्ण झाला असून त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे.
हा सेवा रस्ता झाल्यामुळे नागरिकांची चांगली सोय झाली असून वारजेकडे जाणाऱ्या नागरिकांच्या वेळेत निश्चितच बचत झाली आहे. परंतु सध्या या सेवा रस्त्यावर चांदणी चौकात सुरू असलेल्या बहुमजली उड्डाण पुलाच्या कामामुळे हायवेची वाहतूक देखील वाढली आहे. या सेवा रस्त्यावर बेशिस्त वाहतूक होत असल्याने नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फूटपाथ, थर्माप्लास्टिक पट्टे, योग्य वाहतूक नियोजन, दिशादर्शक फलक, गतिरोधक, सिग्नल, करणे गरजेचे आहे. तसेच भुसारी कॉलनी व वेदभवन परिसरातून सेवा रस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या ठिकाणी योग्य पद्धतीने डांबरीकरण करणे देखील गरजेचे असल्याचे वरपे यांनी सांगितले.

या दोन्ही सेवा रस्त्यावर बरेच दिवसापासून चांदणी चौकाच्या कामांमुळे विदयुत दिवे बसवले गेले नसल्याने रस्त्यावर अंधार असतो, त्यामुळे या पूर्वी अनेक अनुचित प्रकार घडले आहेत व पुढे देखील याचा धोका संभवतो त्यामुळे सदर रस्त्यावर तातडीने विदयुत व्यवस्था करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
महामर्गवरील चांदणी चौकात बहुमजली उड्डाणपुलाचे काम चालू आहे, सदर प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर या भागातील वाहतूक समस्या पूर्णपणे सुटण्यास नक्कीच मदत होणार आहे व सद्य स्थितीत काही अंशी सुटली देखील आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. परंतु सर्व्हिस रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक थांबण्यासाठी केलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून संबंधित विभागानं योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी वरपे यांनी केली आहे.
या मागणीनंतर लगेचच संबंधित विभागांच्या अधिकार्यांना (NHAI Peoject Manager) मा.एस.एस कदम यांनी या महिन्याच्या अखेर पर्यंत ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत.



