पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातील शिपाई व रखवालदार सेवत कायम ; आयुक्तांनी काढले आदेश

सेवेत कायम झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदोत्सव
पुणे : पुणे महानगरपालिकेत शिक्षण मंडळात कार्यरत असलेले रोजंदारीवरील १०० शिपाई व ३०० रखवालदार यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायम करून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी आदेश काढला होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हा विषय प्रलंबित राहिला होता तो आज मार्गी लागला असून या शिपाई व रखवालदारांना सेवेत कायम करून घेण्यात आले आहे.
सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून आज महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्याचे आदेश काढले. या संदर्भात उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिक्षण मंडळाचा आकृतीबंध मंजूर घेण्यासंदर्भात संबधित खात्याला सूचना दिल्या होत्या तसेच या कर्मचाऱ्यांच्या कायम करण्याबाबत आदेश काढण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांना दिल्या होत्या.
वर्षानुवर्ष काम करणारे हे कर्मचारी सेवेत कायम व्हावेत यासाठी आमदार रवींद्र धंगेकर, व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता या पाठपुराव्याला आज यश मिळाले आहे.
आज सेवेत कायम झाल्याचे आदेश शिपाई व रखवालदार यांना मिळाल्याने त्यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात आला. मागील वर्षी शासन निर्णय होऊनही हे काम काही तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित राहिले होते, त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याकडे या सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. आज आखेर त्यांची ही अनेक वर्षांची प्रतीक्षा संपल्याने हे कर्मचारी समाधानी झाले आहेत.

या सर्व सेवकांनी महाराष्ट्र शासन, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रवींद्र धंगेकर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, म न पा आयुक्त व प्रशासनाचे आभार मानून आनंद व्यक्त केला.
शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून त्यांचे आभार मानले.








