राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुण्यात जल्लोष; निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत- शहराध्यक्ष दीपक मानकर

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिले. त्यानंतर पुण्यात अजित पवार गटाने फटाक्यांची आतषबाजी करत, एकमेकांना पेढे भरवून आपला आनंद साजरा केला.यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.फटाक्यांची आतिषबाजी केली.
नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालय परिसरामध्ये मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात नाचत आनंद साजरा केला.कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून अजित पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, वनराज आंदेकर, दत्ता सागरे, शांतिलाल मिसाळ आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दीपक मानकर म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजिदादांचाच आहे. घड्याळाचे चिन्ह देखील अजिदादांचेच आहे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजिदादांचाच आहेत. लोकशाहीला साजेसा असा निर्णय झाला आहे. सर्वांनाच निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे अतिशय आनंद झाला आहे.












