वारजेतील पालिका रुग्णालयातील उर्मट डॉक्टरच्या विरोधात संतप्त भावना..अशा मुजोर डॉक्टरला तर

वारजे : वारजेतील महापालिका दवाखान्यातील काल घडलेल्या प्रकारानंतर डॉक्टरच्या उद्धटपणाचा आता सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. कधी वारजेतील पालिका दवाखान्याला दारू पिऊन कामावर येणारा डॉक्टर मिळतो तर कधी उद्धट वागणारा..त्यामुळे वारजेतील महापालिका दवाखान्यांना चांगले डॉक्टर देण्यात यावेत अशी मागणी आता कालच्या प्रकरणानंतर केली जाऊ लागली आहे.
काल शुक्रवारी सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार महादेव पवार वारजेतील कै. पृथक बराटे रुग्णालयात गेले असता त्यांना एका विचित्र अनुभवला सामोरे जावे लागले. या रुग्णालयात असणारे डॉ. नितीन महाळुंगे (तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेले डॉक्टर) यांनी पत्रकार महादेव पवार यांच्याबरोबर गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. महाळुंगे यांनी पवार यांच्याशी उद्धटपणे बोलून, “माझं नाव मी सांगणार नाही, जा तुम्हाला काय करायचं ते करा असे म्हटले. पत्रकाराने स्वतःची ओळख आणि ओळखपत्र दाखवूनही डॉ. महाळुंगे यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला. महापालिका रुग्णालयातील एक डॉक्टर अशा प्रकारे पत्रकाराशी बोलत असेल तर रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांशी कसे वर्तन करत असेल असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला असून या संबंधित डॉक्टरवर कडक स्वरूपात कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.
या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत रोष व्यक्त करण्यात आला.
याबाबत माजी नगरसेवक किरण बारटक्के म्हणाले, कॉन्ट्रॅक्टवरच्या डॉक्टरांना महापालिकेच्या दवाखान्याविषयी आस्था नाही ते पगारापुरते येतात आणि जातात.. कै. पृथक बराटे रुग्णालयातील डॉक्टर पत्रकारांशी असं बोलत असतील तर ते येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना कसे ट्रीटमेंट देत असतील हा एक महत्त्वाचा विषय आहे. कॉन्ट्रॅक्टवरच्या अशा उर्मट आणि मुजोर डॉक्टरांवर प्रशासनाने कडक भूमिका घेऊन त्यांना कामातून मुक्त केलं पाहिजे. पत्रकार तिथे सर्वसामान्य नागरिकांना कशी सुविधा मिळते..काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी गेलते ना..माहिती मिळवणं त्यांचं काम आहे पण असे प्रकार होत असतील तर संबंधित डॉक्टरवर कारवाई होणं आवश्यक आहे.

माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी कै. पृथक बराटे रुग्णालयात पत्रकाराच्या बाबतीत घडलेला प्रकार खेदजनक असल्याचे म्हंटले आहे. डॉक्टर जर अशा भाषेत बोलत असतील तर सर्वसामान्य नागरिकांना ते कसे वागवत असतील असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. या प्रकाराची महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांनी तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.
माजी स्विकृत नगरसेवक सचिन दशरथ दांगट म्हणाले, आजकाल खाजगी दवाखाने, हॉस्पिटल हे सर्वसामान्य नागरिकांना आवाक्याबाहेर होत चालले आहेत. पुणे महानगरपालिका हद्दीतील कोणतीही व्यक्ती योग्य वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहू नये या उद्देशाने अशा अनेक दवाखान्यांची निर्मिती केली आहे. या दवाखान्यातील कर्मचारी, डॉक्टर पेशंटला चुकीच्या पद्धतीने वागणूक देऊन प्रशासनाचे नाव खराब करीत आहेत , या लोकांवर प्रशासनाने कडक समज देऊन योग्य ती कारवाई करावी. पुणे महानगरपालिकेचे अनेक अधिकारी,डॉक्टर, कर्मचारी हे नागरिकांशी अतिशय चांगले वागतात परंतु अश्या काही बेजबाबदार लोकांमुळेच प्रशासनाचे नाव खराब होत असल्याची नोंद मनपा आयुक्तांनी घ्यावी.
खडकवासाला मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन बराटे म्हणाले पत्रकाराला अशी वागणूक दिली जात असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत असतील. हा झालेला प्रकार निंदनीय असून संबंधित डॉक्टरवर कडक स्वरूपात कारवाई केली जावी. सर्वसामान्य नागरिक त्रास सहन करतात कारण त्यांना उपचार घ्यायचे असतात पण पत्रकारसोबत हा प्रकार घडल्याने ही बाब समोर आली आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांशी आदराने बोलणे गरजेचे आहे पण तसे होत नसेल तर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.






