किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक; गृहमंत्री म्हणाले…

मुंबई : खार पोलीस स्थानकामधून बाहेर पडताना पोलीस स्थानकाबाहेर जमलेल्या संतप्त शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत चप्पलाही फेकण्यात आल्या. सोमय्याच्या गाडीच्या डाव्या बाजूची काच दगडफेकीमध्ये फुटली असून सोमय्यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झाली.
किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकामधून बाहेर आल्यानंतर काही अंतरापर्यंत पोलिसांनी जमलेल्या शिवसैनिकांना गाडीपासून दूर ठेवले. मात्र समोरच मेट्रोचं काम सुरु असल्याने अरुंद रस्त्यावरुन जाताना गाडीचा वेग पुढे जाऊन मंदावला. याच संधीचा फायदा घेत काही जणांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. काहींनी सोमय्यांच्या गाडीवर चप्पलाही फेकल्या. सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत काहीजण मोठ्याने शिवीगाळ करत होते.दगडफेकीनंतर किरीट सोमय्यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला. मुंबई पोलीस आणि उद्धव ठाकरेंच्या संगनमताने हा हल्ला झाला आहे. कारवाईचा आग्रह करण्यासाठी भाजपाचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार आहे, असं सोमय्या म्हणाले.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आल्याचं गृहमंत्री यावेळी म्हणाले. “गेले दोन दिवस सतत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला. रात्री जी घटना घडली त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस आपली कारवाई करतील, असं वळसे पाटील म्हणाले.
यासंदर्भात सगळ्यांनी समजुतीनं घ्यावं, असं आवाहन वळसे पाटील यांनी केलं आहे. “दुर्दैवाने अशी घटना घडली आहे. पण त्यात सगळ्यांनीच समजुतीनं सहकार्य करायला हवं. दगडफेक झाली आहे हे खरं आहे. ती कुणाकडून झाली काय झाली, हा तपासाचा भाग आहे. त्याचा तपास करून पोलीस योग्य ती कारवाई करतील”, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.



