चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्व्हिस रस्ता पूर्ण करण्याची अल्पना वरपे यांची मागणी..

कोथरुड : कोथरुड मधील चांदणी चौकात सुरु असलेल्या बहुमजली उड्डाण पुलाच्या कामामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्गालगतचा डावी भुसारी कॉलनी येथून पावनखिंड, महात्मा सोसायटी- डी पी रोड कडे जोडल्या जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे अर्धवट असलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नगरसेविका अल्पना वरपे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालकांकडे केली आहे. Alpana Warpe demands completion of service road in Left Bhusari Colony to reduce traffic congestion at Chandni Chowk.
या संदर्भातील निवेदन वरपे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी चिटणीस यांच्याकडे दिले आहे. यावेळी प्रदेश युवा मोर्चा चिटणीस गणेश वरपे उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक १० मधील भुसारी कॉलनी लगत असणाऱ्या पुणे-बैंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात बहुमजली उड्डाणपूलाचे काम चालू आहे. सदर प्रकल्पामुळे या भागातील वाहतूकसमस्या कायमची सुटण्यास मदत होणार आहे. परंतु सद्य स्थितीत या चालू असलेल्या कामामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे व त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले असल्याचे वरपे यांनी म्हंटले आहे.
नुकतीच केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला भेट दिली व सदर कामाचा आढावा घेताना उड्डाणपुलाचे व रस्त्याचे काम चालू असताना स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही या बद्दल योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डावी भुसारी कॉलनी येथून पावनखिंड, महात्मा सोसायटी- डी पी रोड कडे जोडला जाणारा सर्व्हिस रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण झाल्यास चांदणी चौकातील वाहतूक कमी होऊन नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही व अपघाताचे प्रमाण देखील वाढणार नाही. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता सदर रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. या मागणी नंतर महामार्ग प्राधिकरणाचे चिटणीस यांनी सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.






