कर्वेनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेत “श्रीराम वानर सेना” यांना प्रथम क्रमांक

कर्वेनगर : “राजे शिवराय प्रतिष्ठान” च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “किल्ले स्पर्धा-2022” चा बक्षिस वितरण समारंभ सहभागी स्पर्धकांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. कर्वेनगर, वारजे परिसराकरीता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी घराघरांमध्ये किल्ले प्रतिकृती बांधण्याची परंपरा आहे. हाच पारंपरिक वारसा टिकून राहावा तसेच किल्ल्यांद्वारे आपल्याला राष्ट्रभक्तीची ओढ कायम राहावी या उद्देशाने ही स्पर्धा गेली 16 वर्षे प्रतिष्ठानमार्फत घेतली जात आहे. वर्षानुवर्षे या स्पर्धेचा विस्तार वाढत असून अधिकाधिक मुला-मुली आणि समूह यात सहभागी होत असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षीही या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्या सर्व स्पर्धकांना शाबासकी द्यावी आणि त्यातून पुढील वर्षासाठी प्रेरणा मिळावी यासाठी प्राज भिलारे, तसेच सुप्रसिद्ध गायिका, संगीत विशारद रामेश्वरी वैशंपायन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगर भाग सहकार्यवाह तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्थक शिंदे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.



छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रातून त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि तो आचरणात आणला पाहिजे असे मार्गदर्शन माननीय प्राज भिलारे यांनी यावेळी केले. रामेश्वरी वैशंपायन यांनी “म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात” हे गाणे त्यांच्या सुमधुर आवाजात सादर केले. करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक – श्रीराम वानर सेना (Attitude Rockers Group) यांना देण्यात आले. त्यांनी किल्ले पन्हाळगड, पावनखिंड आणि विशाळगड अशा किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांनी केले तर सूत्रसंचालन अक्षय मुळे व आभार निलेश पारीख यांनी केले. याप्रसंगी विक्रमजी बर्गे, रणजित टेमघरे व्यासपीठावर उपस्थित होते.



किल्ले स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक : श्रीराम वानर सेना – किल्ले पन्हाळगड, पावनखिंड आणि विशाळगड
द्वितीय क्रमांक : हिल व्हू सोसायटी – किल्ले प्रतापगड
तृतीय क्रमांक : रुद्र प्रतिष्ठान – किल्ले सिंहगड










