कर्जवसुलीच्या अरेरावी पद्धतीस आळा घालण्याबाबत राष्ट्रवादीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

पुणे : मार्च 2020 पासून लॉकडाऊन आणि निर्माण झालेले आर्थिक अरिष्ट यामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली तर काहींचे व्यवसाय ठप्प झाले. याचा परिणाम फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्जाचे हफ्ते थकले आहेत. परंतु परिस्थितीचा विचार न करता फायनान्स कंपन्या कर्जवसुलीसाठी तालिबानी युक्तीचा वापर तसेच अपमानास्पद भाषेचा वापर करुन दंडेलशाही करत आहेत. ही दंडेलशाही थांबवावी, अशा मागणीचे निवेदन पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर चे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी दिली.
गिरीश गुरनानी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार
गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जगात कोरोना महामारीचे संकट सुरु आहे. यामुळे बराचसा काळ हा लॉकडाऊन आणि शासकीय निर्बंधातच चाललेला आहे. बऱ्याच लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तसेच बरेचसे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. तर काहींनी आपला व्यवसाय बंद केला आहे. यामुळे बऱ्याच नोकरदारांना व व्यावसायिकांना घेतलेले कर्ज फेडणे हे अत्यंत अवघड जात आहे. फायनान्स कंपन्या ह्या कर्जवसुलीसाठी तालिबानी युक्तीचा वापर करुन वाहने बळजबरीने जप्त करणे, वारंवार कर्जदारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना धमकावणे व त्यांच्याबरोबर गैरवर्तनुक करणे अशा विविध प्रकारच्या घटना घडत आहेत.

अशा मुजोर कर्जवसुली करणाऱ्या फायनान्स कंपन्यांना आळा घालावा. तसेच कर्जदारांना थकीत हप्ते भरण्यासाठी काही कालावधी द्यावा जेणेकरुन कर्जदार त्यांचे चालु हप्ते सुलभ पद्धतीने भरु शकतील.
कर्जदारांची कोणतीही मालमत्ता पुर्व कल्पना न देता ताब्यात घेऊ नये. तरी कृपया आपण सदर प्रकरणात लक्ष घालून अशा फायनान्स कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करुन कर्जदारांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली.
गिरीश गुरनानी यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन सादर केले. यावेळी प्रितम पायगुडे, ऋषिकेश कडू, सौरभ ससाणे, धनंजय शेळके, अमोल गायकवाड, अक्षय नागरे, रवी गाडे उपस्थित होते.



