24 तासात हल्ले थांबवा अन्यथा बेळगावात जावं लागेल – शरद पवार

बेळगाव सीमाभागात कन्नड रक्षण वेदिके संघटनेने मांडलेल्या उच्छादानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 24 तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढच्या 48 तासात माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आज सीमाप्रश्नी आक्रमक भूमिका मांडली.
माझ्या एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. पुढच्या 10 दिवसांत दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन होणारं आहे. आज भूमिका घेण्याची वेळ आली आहे त्यामुळं पत्रकार परिषद घेतली आहे”, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

संविधानाने सर्वांना अधिकार दिलेत आहेत, ज्यांनी हे संविधान दिले त्यांच्या महापरिनिर्वाणा दिवशी आज काही तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. कर्नाटक सरकारकडून सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत. सातत्यानं वेगवेगळी वक्तव्ये येतं आहेत. या सगळ्या बाबीतून स्पष्ट होतं आहे की सीमाभागात किती गंभीर परिस्थिती आहे. सीमाभागात ज्या काही घटना घडतात त्यावेळी त्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते माझ्या सातत्यानं संपर्कात असतात. आज जी माहिती आली आहे माझ्याकडे ती गंभीर आहे. तिथं गाड्या तपासणे, कार्यकर्त्यांची चौकशी करणे सुरू आहे. मराठी भाषिकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतं आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
या विषयात राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे होत मात्र ती घेतली जात नाही. आज हल्ले झाले त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासात वाहनावरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल आणि जे होईल त्याला कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा शरद पवारांनी दिला.
देशाच्या ऐक्याला धक्का देण्याचं काम केलं जात आहे. उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरू होतं आहे. मी खासदारांना विनंती करणार आहे की त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यावी. तरी देखील भूमिका घेतली गेली नाही तर आम्हाला भूमिका घ्यावी लागणार आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.



