सातत्याने अवमान तरी एकनाथ शिंदे गप्प ; स्वाभिमान गहाण टाकलाय काय : सुप्रिया सुळे यांची टीका

वारजे : खासदार सुप्रिया सुळे यांनी वारजे येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांचा सातत्याने अवमान करत असताना एकनाथ शिंदे गप्प राहत असतील तर त्यांनी त्यांचा स्वाभिमान गहाण ठेवलाय काय असा प्रश्न निर्माण होत आहे. सोन्याच्या पिंजऱ्या सारखी एकनाथ शिंदे यांची अवस्था झाली असल्याची टीका सुळे यांनी केली.
पुणे महापालिका मराठी भाषा संवर्धन समिती, साहित्यिक कट्टा वारजे आयोजित शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कवि संमेलनातील कवितांचा संग्रह शरदाचे चांदणे या काव्य संग्रहाचे प्रकाशन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे महापालिका माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, सायली वांजळे, लक्ष्मी दुधाने, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, काका चव्हाण, सुरेश गुजर, त्रिंबक मोकाशी, निवृत्ती येनपुरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन वारजे साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून सातत्याने साहित्य विषयक उपक्रम राबवणाऱ्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ यांनी केले होते.
सुळे पुढे हे सरकार नवीन चांगले निर्णय घेऊ शकत नाही पण त्यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेले चांगले निर्णय बंद करण्याची भूमिका घेतली असून यामुळे जनतेचे फार मोठे नुकसान होणार आहे. सध्या देशात दडपशाही सुरू आहे. दिल्लीत महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन न करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे, याचा मी जाहीर निषेध करत असून दिल्लीत गेल्यावर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रुपाली चाकणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दिपाली धुमाळ यांनी वारजे साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. महेश कुलकर्णी व चंद्रकांत पंडीत सूत्रसंचालन केले तर महादेव गायकवाड यांनी आभार मानले
पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने महिला बचत गटातील महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध कोर्सेसचे प्रशिक्षण शिबीरात सहभागी झालेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप समारंभ यावेळी पार पडला.




