आजच्या हल्ल्यातून बचावलो ; पण जो पर्यंत जिवंत तो पर्यंत संघर्ष करणारच : निखिल वागळे
पुणे : आज पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या साने गुरुजी सभागृहात निर्भय बनो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार निखिल वागळे उपस्थित राहण्यासाठी येत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. गाडीवर शाईफेक करण्यात आली. ॲड. असिम सरोदे हे देखील गाडीत होते. या प्रकारानंतर निखिल वागळे यांनी कार्यक्रमस्थळी पोहचून भाषण केले व भाजप व सरकारवर जोरदार टीका केली.
निखिल वागळे ज्यावेळी भाषणाला उभे राहिले त्यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावर वागळे यांनी आता मला जिवंत असल्यासारखं वाटतं आहे असे म्हणतानाच ज्यांनी आजचा हल्ला केला आहे त्यांना मी माफ केलं आहे असं जाहीर केल. तसेच आम्ही जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत संघर्ष करणारच असे ते म्हणाले. जेव्हा गाडीच्या काचा फुटल्या, तेव्हा असीमने माझ्या डोक्याला हात लावला. श्रेया पुढे बसली होती. तिचं डोकं खाली केल्याने ती वाचली. जोपर्यंत आमची लोकं वाचतील तोपर्यंत तुमचं काही खरं नाही”, असा इशारा वागळे यांनी यावेळी दिला.
हे खरंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं शहर आहे. या शहरात 1942 मध्ये आचार्य अत्रे यांची सभा उधळण्याचा प्रयत्न संघाने केला होता, त्यावेळी आचार्य अत्रे असं म्हणाले होते की, आम्हाला मारणारे मेले. आम्ही जिवंत आहोत. मी एवढंच म्हणतो. तेही जिवंत राहो आणि आम्हीसुद्धा जिवंत राहो. या सर्व हल्लेखोरांना मी माफ केलंय.
शिवाजी महाराजांपासून शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत, सगळी आपली परंपरा आहे. आपली संतांची परंपरा आहे. ही परंपरा आज खेचून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे असे वागळे म्हणाले.
महात्मा फुले यांना देखील मारायला आले होते तेव्हा त्यांनी त्यांचं मतपरिवर्तन केलं होतं. त्यानंतर ते फुले यांच्यासोबत काम करायला लागले होते. मला संधी मिळाली तर या भाजपवाल्यांचंही परिवर्तन करुन टाकेल. तो माझा मार्ग आहे. माझ्यावर झालेला हा सातवा-आठवा हल्ला आहे. 1979 साली पहिला हल्ला झाला. तेव्हाही गाडीची मागचीच काच फोडली होती. मागून हल्ला केला होता. हा भेकड लोकांचा हल्ला”, अशी टीका वागळे यांनी यावेळी केली.